पुणे स्मार्ट सिटीच्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेत २०० सायकली दाखल

बाबा तारे
मंगळवार, 26 जून 2018

पुणे : स्मार्ट पुणेकर नागरिकांकडून मिळणा-या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने  राबविण्यात येत असलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन बालेवाडी येथील हाय स्ट्रीट येथे नगरसेवक व प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे : स्मार्ट पुणेकर नागरिकांकडून मिळणा-या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने  राबविण्यात येत असलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन बालेवाडी येथील हाय स्ट्रीट येथे नगरसेवक व प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. राजेंद्र जगताप, नगरसेवक विजय शेवाळे, बाबुराव चांदेरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप कदम यांच्यासह बाणेर-बालेवाडी भागातील रहिवासी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “कोणतीही शासकीय योजना ही लोकसहभागातून अधिक प्रभावी आणि यशस्वी होते. पुण्याला स्मार्ट बनवण्यासाठी नव्या कामांसोबतच प्रथम समस्या कमी करण्यावर भर दिला पाहिजे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यास हातभार लागेल,” अशी आशा  डॉ. राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.

जगताप पुढे म्हणाले, “स्मार्ट सिटी योजनेतील क्षेत्र आधारित विकासकामे करतांना शहराच्या इतर भागांनाही सोबत घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या परिसरातील नागरिक आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही येथे ही पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा सुरू केली आहे.”  यावेळी  अमोल बालवडकर म्हणाले, “स्मार्ट सिटी मिशन वर्धापनदिनाचे औचित्य साधून या नाविन्यपूर्ण योजनांना पुण्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. त्यामुळे या योजनांना मोठे यश मिळेल, अशी आशा वाटते .बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांनी सजग राहून केंद्र सरकारच्या या स्मार्ट योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आणि आपला परिसर स्मार्ट होण्यासाठी सायकलची योजना यशस्वी करावी. सायकलींचे शहर म्हणून पुण्याची जुनी ओळख पुन्हा मिळायला हवी. बाणेर - बालेवाडी परिसरात एकूण पंधरा ठिकाणी पेडल सायकल स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. यापैकी एका स्टेशनवरून सायकल घेऊन गेल्यानंतर आपली गरज संपल्यावर तेथून जवळ असणाऱ्या दुसऱ्या पेडल स्टेशनलादेखील सायकल लावता येणार आहे, असे झूमकार पेडलच्या व्यवस्थापकांनी सांगितले. डी-मार्ट, क्रोमा, पोस्ट ९१, कमिन्स, ओह सो स्टोनड्, प्रभावी टेक पार्क, माँट व्हर्ट, फ्लेवर्स ऑफ हैदराबाद, रास्ता कॅफे, सिंधू वडेवाले, चैतन्य पराठा, वेलनेस, आदिदास, क्लासिक रॉक, क्रीम स्टोन या ठिकाणांच्या समोर सुध्दा सायकल स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. 

यावेळी भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या शंभर विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढत आरोग्यदायी जीवनमान आणि सुरक्षित व स्वच्छ पर्यावरणाचा संदेश दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका  भावना पै म्हणाल्या, “स्मार्ट सिटी बनवण्यास हातभार लावणाऱ्या अशा उपक्रमांना आम्ही नेहमीच सहकार्य करू. हरित आणि स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सायकलचा वापर करण्याचे आम्ही सर्वांना  आवाहन करतो.”

यापूर्वी, पहिल्या टप्प्यामध्ये झूमकार पेडलच्या सहकार्याने पुणे स्मार्ट सिटीने (५ डिसेंबर) २०१७ ला महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करून पुणे विद्यापीठात ही सायकल शेअरिंग सेवा सुरू केली होती. त्यानंतर औंधमध्येही ७ डिसेंबर रोजी ही सेवा सुरू करण्यात आली. विद्यापीठ परिसर आणि औंधमध्ये एकूण १७५ सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला, आणि केवळ पावणेदोनशे सायकलींवर पहिल्या महिन्यातच २६ हजारांहून अधिक पुणेकरांनी या सेवेचा लाभ घेतला. हा प्रतिसाद पाहून इतर कंपन्यांनीही सायकली उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. नागरिकांसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने विविध भागांत हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. तसेच, कृषी विद्यापीठ परिसरातही ५० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 cyclists in Pune's Smart City's Public Bioscope Sharing Service