
पुणे - बांधकामासाठी पिण्याचे पाणी किंवा इतर पाणी न वापरता महापालिकेने मैला शुद्धीकरण प्रकल्पात (एसटीपी) शुद्ध केलेले पाणी वापरावे असे आवाहन वारंवार करून देखील त्याकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शहरातील २०८ बांधकाम साईटला बांधकाम बंद करण्याची नोटीस दिली जाणार आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
यासंदर्भात आज महापालिकेत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला आहे. जून महिना अर्धा संपला तरी अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही. खडकवासला धरणा प्रकल्पातील पाणी साठा कमी होत असल्याने महापालिकेने यापूर्वीच आठवड्यातील एक दिवस पाणी बंद करून कपात सुरू केली आहे. तसेच विविध प्रकारे पाणी बचतीसाठी उपाय योजना सुरू आहेत. पुणे शहराच्या चौफेर मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्याठिकाणी महापालिकेचे पिण्याचे पाणी किंवा बोअरींगद्वारे भूगर्भातील पाण्याचा वापर केला जातो. या पाण्याचा वापर बांधकामासाठी करू नयेत असे आदेश महापालिकेने यापूर्वीच काढले आहेत.
बॅच मिक्स प्लांट, मॉलमधील कुलिंग टॉवर, वॉशिंग सेंटरसाठी देखील प्रक्रिया केलेले पाणीच वापरावे लागणार आहे. शहरातील आठ मैला शुद्धीकरण प्रकल्पात सुमारे ३५० एमएलडी मैला पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी नदीत सोडले जात आहे. हे पाणी बांधकामासाठी वापरणेही योग्य आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी मैला शुद्धीकरण केंद्रातून टँकर भरून पाणी न्यावे असे आवाहन महापालिकेने वारंवार केले आहे.
त्यासाठी बांधकाम संघटनांना पत्र देखील पाठविले आहे. तरीही बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची सद्यःस्थिती आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या सोईसाठी महापालिकेने ‘पीएमसी एसटीपी टँकर सिस्टीम’ नावाचे ॲप तयार केले आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यात नोंदणी करून टँकरवर पाण्याची मागणी नोंदवून पाणी घेता येणार आहे.
शहरात सध्या ३२६ बांधकाम साइट सुरू आहेत, त्यापैकी केवळ ११८ ठिकाणी ॲपवर नोंदणी करून एसटीपीचे पाणी वापरण्यास सुरवात झाली आहे. तर उर्वरित २०३ ठिकाणी पिण्याचे पाणी किंवा बोअरींगचे पाणी वापरले जात आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकारी अभियंत्याने व उप अभियंत्याने त्यांच्या हद्दीतील बांधकाम व्यावसायिकाला ॲपची माहिती द्यावी, तसेच बांधकाम साइटवर जाऊन पाणी वापराची तपासणी करावी. जे बांधकाम व्यावसायिक एसटीपीचे पाणी वापरणार नाहीत, त्यांना बांधकाम बंद करण्यासंदर्भात नोटीस बजावण्याचे आदेश आज बैठकीत दिले आहेत.
अशी आहे शहरातील स्थिती
भाग - सुरु असलेले प्रकल्प- नोंदणी केलेले- नोंदणी न केलेले
लोहगाव कळस हडपसर -५५ - २२ - ३३
वडगाव शेरी - ४ -२ -२
खराडी - १२ - ४ - ८
कर्वेनगर-एरंडवणे-कोथरूड - ९९ - ५ - ९४
वारजे- बावधन- बालेवाडी - ६७ - ६७ - ०
औंध-शिवाजीनगर-पाषाण - ५७ - ५ - ५२
विमाननगर-लोहगाव - १० - ४ -६
फुरसुंगी-उंड्री - २२ - ९ - १३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.