पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २१० नवीन कोरोना रुग्ण | Corona Patients | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient
पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २१० नवीन कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २१० नवीन कोरोना रुग्ण

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.११) दिवसभरात २१० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट १४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवाळी झाल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच जिल्ह्यातील दिवसातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या खूप कमी झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. मागील चार दिवसांत दोन हजारांच्या आत आलेली सक्रिय रुग्णांची संख्या आज पुन्हा दोन हजारांहून अधिक झाली आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार १५० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

हेही वाचा: कोरोना रुग्ण संख्या घटल्याने आरोग्य कर्मचारी कमी करण्याची सूचना

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील ७५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दररोज रात्री जिल्ह्यातील दिवसांतील कोरोना रुग्णांची स्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून सक्रिय रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात पुणे शहरापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये ४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७१, नगरपालिका हद्दीत १८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन नवीन रुग्ण आढळले आहेत.

दिवसातील कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ४४, पिंपरी चिंचवडमधील ४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३९, नगरपालिका हद्दीतील १७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २ रुग्णांचा समावेश आहे. अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील एक आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन मृत्यूचा समावेश आहे.

loading image
go to top