कोरोना रुग्ण संख्या घटल्याने आरोग्य कर्मचारी कमी करण्याची सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्ण संख्या घटल्याने आरोग्य कर्मचारी कमी करण्याची सूचना

कोरोना रुग्ण संख्या घटल्याने आरोग्य कर्मचारी कमी करण्याची सूचना

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने, केवळ कोरोनासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात आलेले आरोग्य कर्मचारी कमी करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला केली आहे. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर केवळ हिंजवडी येथील विप्रो रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. हे रुग्णालय जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येत आहे.

हेही वाचा: "फाळणीसाठी मुस्लीम नाही, तर काँग्रेस आणि जीना जबाबदार"

ग्रामीण भागातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता ८०७ इतकी कमी झाली आहे. ही संख्या गेल्या महिनाअखेरपर्यंत दोन हजारांहून अधिक होती. सद्यःस्थितीत ग्रामीण भागातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४९१ रुग्ण हे विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित ३१० जण गृह विलगीकरणात आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी विविध रुग्णालयांत कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त मनुष्यबळ घेण्यात आले होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा: "विराटने खेळाडू म्हणूनच राहावं, कर्णधारपदाच्या मोहात पडू नये"

विप्रो रुग्णालयांत एकूण ५०४ बेडस (खाटा) उपलब्ध आहेत. सध्या या रुग्णालयात केवळ १२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. येथे १२ परिचारिका, दोन मेट्रन्स, एक व्यवस्थापक आणि चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ज्या कोरोना रुग्णालयात मनुष्यबळ उपलब्ध नाही, तेथील कोरोना रुग्ण आता उपचारासाठी विप्रो रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

loading image
go to top