उद्योजक, कामगारांना विचारात घ्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

केंद्र सरकारच्या उद्योग आणि करविषयक धोरणात सातत्य हवे, औद्योगिक धोरण राबविताना उद्योजक आणि कामगार या दोघांना विचारात घ्यावे, त्याचप्रमाणे राज्यातील वीजदर कमी असावेत, सरकारी अधिकाऱ्यांचा उद्योजकांना जाच वाटू नये, अशा अपेक्षा चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये रविवारी (ता. ८) झालेल्या ‘वेक अप महाराष्ट्र’ या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात सहभागींनी व्यक्त केल्या.

पिंपरी - केंद्र सरकारच्या उद्योग आणि करविषयक धोरणात सातत्य हवे, औद्योगिक धोरण राबविताना उद्योजक आणि कामगार या दोघांना विचारात घ्यावे, त्याचप्रमाणे राज्यातील वीजदर कमी असावेत, सरकारी अधिकाऱ्यांचा उद्योजकांना जाच वाटू नये, अशा अपेक्षा चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये रविवारी (ता. ८) झालेल्या ‘वेक अप महाराष्ट्र’ या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात सहभागींनी व्यक्त केल्या. 

प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने फेसबुकवर ‘वेक अप महाराष्ट्र’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आर्थिक मंदी आणि त्यावरील उपाययोजना मांडण्यासाठी, तसेच उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, याबद्दल आपापल्या संकल्पना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘आर्थिक मंदी आणि बेरोजगारी’ या विषयावर कार्यक्रमात चर्चा झाली. यामध्ये सामान्यांपासून ते उद्योजकांपर्यंत विविध नागरिक सहभागी झाले होते. या प्रसंगी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश सचिव प्रिया पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते. 

उद्योजक अभय भोर म्हणाले, ‘‘सरकारकडून स्थानिक उद्योजकांना प्राधान्य द्यावे. परदेशी उद्योगपतींना देण्यात येणाऱ्या सवलती देशातील उद्योजकांना देण्यात याव्यात. सरकारने वस्तू आणि सेवाकराबाबत जनजागृती करावी.’’ कामगार नेते अनिल रोहम म्हणाले, ‘‘सरकार कामगारांविषयी चुकीची धोरणे राबवीत आहे. कायम कामगार ठेवायचे नाहीत, असे धोरण कंपन्या राबवीत आहेत. राष्ट्रीय रोजगार अभिवृद्धी योजनेसारख्या (निम) कामगार हिताच्या विरोधातील योजना राबविण्यात येत आहेत.’’ 

अशोक काळभोर म्हणाले, ‘‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी डिझेल वाहने बंद करण्याच्या घोषणा करतात. मात्र त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करीत नाहीत.’’ चाकण येथील कामगार तुषार पाटील म्हणाले, ‘‘मंदीमुळे चाकण परिसरातील चार ते पाच हजार जणांना रोजगार गमवावा लागला आहे. काही कंपन्या कायम कामगारांना आठवड्यातून एक दिवस सक्तीची रजा देऊन त्या दिवशीचे वेतन पगारातून कापत आहेत.’’ बांधकाम व्यावसायिक शुभांगी निकम म्हणाल्या, ‘‘मजूर अड्ड्यांवरील कामगारांना दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत काम मिळत नाही.’’ सत्यजित तांबे म्हणाले, ‘‘शैक्षणिक कर्जासाठी बॅंका बेकायदा पद्धतीने पालकांकडून कर्जाची हमी घेत आहेत. कराच्या दहशतीमुळे नागरिक अडचणीत आले आहेत. कर्जामुळे बॅंका अडचणीत आल्या.’’ सचिन साठे म्हणाले, ‘‘सरकारकडून उद्योजकांना भीतीखाली ठेवण्यात येत आहे. कंपन्या उत्पादन बंद करीत आहेत. यासंदर्भात आम्ही आंदोलने करीत आहोत. पण तरीही सरकारला जाग येत नाही.’’ अमृता शेडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा