राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ नगरसेवकांचे बंड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या  २४ नगरसेवकांचे बंड

पिंपरी - नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधात बसण्याची वेळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता विरोधी पक्ष म्हणूनही मान्यता मिळणार नाही, याची पुरेपूर खबरदारी भाजपने घेतली आहे. कारण, राष्ट्रवादीचे नियोजित गटनेते योगेश बहल यांच्या विरोधात त्याच पक्षाच्या २४ नवनिर्वाचित नगरसेवकांनी बंड पुकारले आहे. राष्ट्रवादीच्या गोटात भाजपनेच हा सुरुंग पेरल्याचे कळते. राष्ट्रवादीचे चिखलीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. ज्यांच्यामुळे पक्षाचे शहरात पानिपत झाले, ज्यांनी पक्षाचे वाटोळे केले, त्यांच्याच ओंजळीने पाणी पिणार नाही, असा निर्धार व्यक्त करून या नगरसेवकांनी महापालिकेत स्वतंत्र गट स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत दत्ता साने ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘महापालिकेच्या निवडणुकीत याच काही निवडक नेत्यांमुळे पक्षाचे वाटोळे झाले. सत्तेवरून पक्षाला पायउतार व्हावे लागले. एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीची नाचक्की झाली. त्याच योगेश बहल आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे परत पक्षाचे नेतृत्व जाणार असेल, तर आमच्या सारख्या स्वाभिमानी लोकांना ते कदापि पटणार नाही. अजित पवार यांच्यावर आमची निष्ठा होती; पण पक्षाने आम्हाला आजवर काहीच दिले नाही. आता गटनेता, विरोधी पक्षनेता ठरविण्याची वेळ आली, तर आम्हाला साधे विचारातही घेतले गेले नाही. झालेल्या पराभवातून नेतृत्व काही शिकले असेल, असे वाटले होते; पण त्यात सुधारणा झालेली नाही.’’ 

गटनेतेपदी योगेश बहल यांची निवड केली; पण ते कोणत्याही क्षणी भाजपशी साटेलोटे करू शकतात, असा आरोप करून साने यांनी प्रसंगी नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. ते म्हणाले, ‘‘एकेकाळी सायकलवर फिरणारा हा माणूस शंभर कोटीहून अधिक माया कशी जमवितो?

महापालिकेच्या जीवावर हे नेते मोठे झाले, हे शहरवासीयांना माहिती आहे. बेताल व मनमानी कारभार करणाऱ्यांमुळेच पक्षाला हे दिवस पाहण्याची वेळ आली आहे. पक्षाची व नेत्यांची हीच कार्यपद्धती राहणार असेल, तर स्वतंत्र गट स्थापन केलेला बरा. हा विचार करून आम्ही महापालिकेत आमचा स्वतंत्र गट स्थापणार आहोत.’’

दत्ता साने यांच्याबरोबर २४ नगरसेवक आहेत. बुधवारी (ता. ८) या सर्वांची निगडीतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत बहल यांच्या निवडीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. आता अजित पवार यांचे ऐकण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. त्यामुळे महापालिकेचे नवे सदस्य मंडळ येत्या १४ तारखेला स्थापन होताच आमच्या स्वतंत्र गटाची स्थापना केली जाईल, असे साने यांनी सांगितले. 

साने यांच्याबरोबर कोणीही नाही - बहल 
पंधरा वर्षे सत्तेत राहिलो. आता सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. जनतेने आपल्याला विरोधात बसण्याचा आदेश दिला आहे. ही वेळ आपसांत भांडण्याची नाही. भाजपचा कारभार पारदर्शक होतो की नाही याकडे पाहण्याची वेळ आहे. साने यांचा बंडाचा पवित्रा असला, तरी त्यांच्याबरोबर कोणीही नगरसेवक नाहीत. माझी त्यांनाही विनंती आहे, की जे मतभेद असतील ते एकत्र बसवून सोडवू. माझी चर्चेची तयारी आहे. मी सहाव्यांदा निवडून आलो. सभागृह, स्थायी समिती, महापौर अशा सर्व ठिकाणी काम केले. हा अनुभव असल्यानेच अजित पवार यांनी माझी गटनेता म्हणून निवड केली. मी कोणतेही पद मागायला गेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही ३६ नगरसेवक एकत्र आहोत आणि यापुढेही राहू. कोणीही बंड करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com