esakal | चार्जिंगअभावी ई- बसच्या 300 फेऱ्या रद्द 
sakal

बोलून बातमी शोधा

electric-buses.jpg

पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ई-बसच्या चार्जिंग स्टेशनचा वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी संबंधित आगारप्रमुख, बस पुरविणारी कंपनी यांना शुक्रवारी दिला.

चार्जिंगअभावी ई- बसच्या 300 फेऱ्या रद्द 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ई-बसच्या चार्जिंग स्टेशनचा वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी संबंधित आगारप्रमुख, बस पुरविणारी कंपनी यांना शुक्रवारी दिला. ई-बस चार्ज करणारी यंत्रणा शुक्रवारी सायंकाळी सुरू झाली. तत्पूर्वी गेल्या दीड दिवसात ई-बसच्या सुमारे 300 फेऱ्या रद्द झाल्या. 

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 75 ई- बस आहेत. त्यांतील 45 बसचे चार्जिंग हडपसरजवळील भेकराईनगर स्थानकात होते; तर उर्वरित बसचे चार्जिंग निगडीमध्ये होते. पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये या दोनच आगारांत ई-बसच्या चार्जिंगची व्यवस्था आहे. मात्र, भेकराईनगरमधील चार्जिंग स्टेशनमधील वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी बंद झाला, त्यामुळे तेथील ई-बसचे चार्जिंग झाले नाही. परिणामी या 45 बस मार्गावर धावू शकल्या नाहीत. त्यांच्या सुमारे 345 खेपा रद्द झाल्या. बसच्या चार्जिंगसाठी महावितरणने पीएमपीला विशेष ट्रान्स्फार्मरद्वारे वीजजोड दिला आहे. मात्र, त्या ट्रान्स्फार्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चार्जिंग बंद पडल्यावर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी महावितरणकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी बिघाड दूर केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चार्जिंग सुरू झाले. भेकराईनगर आगारात सध्या 45 ई-बस असल्या, तरी तेथे किमान 150 बस चार्ज करता येतील, यासाठी क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते काम अल्पावधीत पूर्ण होणार आहे. चार्जिंगअभावी ई-बस मार्गावर न धावल्यामुळे डिझेलच्या पर्यायी बस उपलब्ध करून त्या मार्गांवर सोडण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांचे नुकसान झाले नाही, असा दावा वाहतूक विभागाकडून करण्यात आला. 


ई-बसचे चार्जिंग बंद कशामुळे झाले, याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. नेमके कारण समजल्यास त्याबाबत उपाययोजना करता येतील आणि पुन्हा असा प्रकार घडणार नाही, यासाठी काळजी घेता येईल. 
- नयना गुंडे, अध्यक्षा, पीएमपी 
 

loading image
go to top