शिष्यवृत्ती कार्यशाळेत तीनशे विद्यार्थी सहभागी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

असा करा अभ्यास

  • चौथीचे इतिहासाचे पुस्तक बारकाईने वाचा.
  • जास्तीत जास्त प्रश्‍नपत्रिका सोडवण्याचा सराव करा. 
  • उत्तरे नोंदविण्यापूर्वी प्रश्‍नाचा शेवटचा भाग पुन्हा वाचा. 
  • पाच प्रश्‍नपत्रिका सोडल्यानंतर झालेल्या चुकांची नोंद करा. 
  • चुका दुरुस्त करून अवघड भागाची उजळणी करा.

पिंपरी - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ आणि कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे प्रेरणा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी’ या विषयावर अमोल नवलपुरे व लक्ष्मण गोगावले यांनी मार्गदर्शन केले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निगडी येथील वालचंद संचेती सभागृहात झालेल्या कार्यशाळेत सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी ‘सकाळ’च्या वितरण विभागाचे मुख्य वितरण व्यवस्थापक अब्दुल अजीज, प्राचार्य शुभांगी इथापे, संजय कुऱ्हाडे उपस्थित होते. प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून नवलपुरे यांनी संवाद साधला. जास्तीत जास्त प्रश्‍नपत्रिका वेळ लावून सोडविण्याचा सराव करावा; तसेच वर्तुळ रंगविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाड टोकाच्या बॉलपेनचा वापर करावा, असे सांगितले. गोगावले यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती घालवण्यासाठी काही सोप्या युक्‍त्या सांगितल्या. गणिताचे कोडे कसे सोडवावे याविषयी युक्‍त्या सांगितल्या. ‘‘या कार्यशाळेमुळे परीक्षेला न घाबरता कसे सामोरे जायचे हे कळले. गणिताच्या अनेक सोप्या युक्‍त्या सांगितल्या,’’ असे अमेय केदारी या विद्यार्थ्याने सांगितले. ‘एनआयई’चे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले. 

विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा शक्‍य तेथे वापर करण्यावर भर देत आहोत. विद्यार्थ्यांना इंटरनेटवर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्याने अनेक विषयांचे आकलन होण्यास सोपे जाते.
- नीता शेटे, नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 student involve in scholarship workshop