esakal | पुण्यात 32 कंपन्यांना हवे कामाच्या ठिकाणी लसीकरण

बोलून बातमी शोधा

vaccination

कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार टाटा मोटर्स, भारत फोर्ज, बजाज ऑटो, फिनोलेक्स केबल, फिनोलेक्स पाईप, शोगिनी टेक्नॉलॉजी, जी. ई. इंडिया, अॅटलस कॉप्को, अॅडव्ही हायटेक आदी कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

पुण्यात 32 कंपन्यांना हवे कामाच्या ठिकाणी लसीकरण

sakal_logo
By
टीम सकाळ

पुणे : कामगारांचे कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील 32 लहान- मोठ्या कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने तो मंजूर केल्यास जिल्ह्यातील सुमारे 4 लाख कामगारांचे लसीकरण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार टाटा मोटर्स, भारत फोर्ज, बजाज ऑटो, फिनोलेक्स केबल, फिनोलेक्स पाईप, शोगिनी टेक्नॉलॉजी, जी. ई. इंडिया, अॅटलस कॉप्को, अॅडव्ही हायटेक आदी कंपन्यांचा त्यात समावेश आहे. कामगारांचे लसीकरण करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका नियुक्त करणे, वेटिंग रूम उभारणे आदी सर्व सेटअप उभारण्याची तयारी या कंपन्यांनी दाखविली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे लसीकरण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. या बाबतचे प्रस्ताव विभागीय उद्योग संचलनायामार्फत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या कार्यालयात सादर झाले आहेत. रांजणगाव इंडस्ट्रीयल असोसिएशननेही लसीकरणासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

डॉ. देशमुख यांनी या बाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडे डोस उपलब्ध झाल्यावर लसीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 45 वर्षांवरील कामगारांचे लसीकरण करण्याची तयारी या पूर्वी कंपन्यांनी दर्शविली होती. केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांच्यावरील सर्वांचेच लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी डोस उपलब्ध झाल्यावर लगेचच लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. कामगारांच्या शिफ्टनुसार लसीकरणाचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये औद्योगिक आवारांत ते होईल.

हेही वाचा: ऑक्सिजनचा न्याय्य वापर करा; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

या बाबत उद्योग संचलनातील विभागीय सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, कामाच्या ठिकाणी कामगारांचे लसीकरण झाल्यास महापालिकांच्या आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा कऱण्यात येत आहे. कामगारांचे लसीकरण अपॉइंटमेंटद्वारेच होणार आहे. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. सूक्ष्म, लघु उद्योगांमधील कामगारांचेही लसीकरण या प्रक्रियेत करण्यात येणार आहे.