#VoteTrendLive संसद ते पुणे महापालिका शतप्रतिशत भाजप

- संभाजी पाटील
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - गुंडांना उमेदवारी दिल्याचा ठपका, नोटाबंदीमुळे नाराज झालेला व्यापारी आणि श्रीमंत वर्ग, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच कॉंग्रेससोबत केलेली आघाडी अशी सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने संसदेपासून महापालिकेपर्यंत शतप्रतिशत सत्ता काबीज केली. ताकद नसलेल्या ठिकाणी बाहेरच्या उमेदवारांना दिलेली संधी, रिपब्लिकन पक्षासोबतची युती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची व्यूहरचना आणि पारंपरिक व नवमतदारांनी भाजपवर पुन्हा एकदा दाखविलेला विश्‍वास याबळावर भाजपचे कमळ महापालिकेत प्रथमच फुलले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या प्रयत्नानंतर पहिल्यापासूनच पराभूत मानसिकतेत असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीएवढ्या जागांपर्यंत जाता आले असले तरी भाजपला सत्तेपासून रोखण्यात यश आले नाही.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महापालिका निवडणुका जिंकण्याची व्यूहरचना भाजपने आखली. त्यादृष्टीने गेली दोन वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि सत्ता मिळविण्यासाठी आवश्‍यक असणारे आणि यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस वापरत असलेले सर्व मार्ग अवलंबले. त्या एकत्रित प्रयत्नातून भाजप पुण्यात सत्तेपर्यंत जाऊन पोहोचला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय काकडे यांना बळ देऊन इतर पक्षातील विजयी होतील असे मोहरे टिपण्याची दिलेली सूटही भाजपच्या पथ्यावर पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्‍मा भोसले यांना ऐनवेळी पक्षात आणण्यासाठी भाजपने दाखवलेली तत्परताही भाजपला फायद्याची ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे गारूड अद्यापही मध्यमवर्गीय आणि नवमतदारांच्या मनावर कायम असल्याचेही पुण्यातील निकालाने दाखवून दिले.

विधानसभा निवडणुकीत आठ आमदार विजयी झाल्यानंतर महापालिकेत मात्र स्थानिक परिस्थिती वेगळी राहील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटत होते, त्यादृष्टीनेच त्यांची पावले पडत गेली. त्याचाच फायदा घेत भाजपने सर्व आठही विधानसभा मतदारसंघात व्यूहरचना आखली. वडगावशेरी, सिंहगड रस्ता, हडपसर या भागात भाजपने कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुने जानते नेते हेरले आणि त्यांना उमेदवारी दिली. या उमेदवारांचे स्वतः:चे पॉकेट आणि भाजपला नागरिकांचा असणारा पाठिंबा याबळावर अनेक ठिकाणी भाजपने खणखणीत यश मिळविले. विमाननगर सारख्या भागात भाजपने बापूराव कर्णे गुरुजींसारखा मुरब्बी आपल्याबाजूला खेचला आणि संपूर्ण प्रभाग कमळाच्या पंखाखाली आणला. अशाच पद्धतीने ठिकठिकाणी झालेली बेरीज भाजपला सत्तास्थानाकडे घेऊन गेली. रिपब्लिकन पक्षासोबत केलेली युतीही भाजपला फायद्याची ठरली. रिपब्लिकन विचाराची मते कमळाला देण्यात दलित कार्यकर्ता मागे राहिला नाही. आतापर्यंत केवळ कॉंग्रेस आघाडीसोबत राहून रिपब्लिकन पक्षाच्या हाती काहीही लागले नाही. पण कमळ चिन्ह घेऊन लढण्याचा निर्णय या पक्षाला फायदेशीर ठरला. त्यामुळे आठवले गटाचे प्रथमच सर्वाधिक उमेदवार कमळ चिन्ह घेऊन का होईल पालिकेत पोहोचले. पण त्याचा फायदा भाजपला इतर आठही विधानसभा मतदारसंघात झाला. भाजप सत्तेवर आल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी पीएमआरडीएची स्थापना, पुरंदर विमानतळाची घोषणा, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, विकास आराखड्यास दिलेली मंजुरी, जायकाची मंजुरी, स्मार्ट सिटी अशा प्रलंबित प्रकल्पांना मान्यता दिली. "दोन वर्षात आम्ही हे करू शकतो, मग पाच वर्षे आम्हाला द्या' असा प्रचारही त्यांनी केला. त्यावर पुणेकरांनी विश्‍वास ठेवला आहे, असेच म्हणावे लागेल.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपची लाट लक्षात घेऊनच कॉंग्रेससोबत काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण आघाडी केली. पण या दोन्ही पक्षाचे गणित शेवटपर्यंत जमले नाही. अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्येच "पॅक' करण्यात आले. शरद पवार यांनी स्वतः: या निवडणुकीत लक्ष घालून अनेक बैठका घेतल्या. पण गेल्या 15 वर्षाच्या कारभाराबाबत नागरिक नाराज होते, हेच या निकालाने स्पष्ट केले. विकास आराखड्याची मंजुरी असो वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट करण्यात आलेले अपयश या सर्वांचा एकत्रित फटका भाजपला बसला. सर्वसामान्य नागरिक भाजपच्या आणि मोदी यांच्या पाठीशी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीचे प्रयत्न अपुरे पडले. दुसरीकडे कॉंग्रेसला पुण्यात पुन्हा एकदा नेतृत्वाची पोकळी जाणवली. त्यामुळे कार्यकर्ते असतानाही कॉंग्रेसची ताकद आणखी घटली. कॉंग्रेसची संख्या घटल्याने राष्ट्रवादीला अपेक्षित असणारा आकडा गाठता आला नाही.

पुण्यात स्वतंत्र लढणारी शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहणार हे भाकीत खरे ठरले. शिवसेनेला स्वबळावर गेल्या निवडणुकीएवढ्या जागा जिंकता आल्या. पण शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्या मुलासह कोथरूड आणि कोंढव्यातील हक्काच्या जागांवर अपयश आले. शिवसेनेला यश कमी मिळवले असले तरी त्यांची पुण्यातील भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. मनसेला दोन आकडी संख्या गाठता येणार नाही हा अंदाज खरा ठरला. मनसे स्पर्धेत आहे की नाही, अशीच पहिल्या पासूनची अवस्था होती, त्यामुळे मनसेचे अनेक नगरसेवक पक्ष सोडून गेले, ज्यांनी पक्ष सोडला ते विजयीही झाले. या पक्षाची मते आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आले. एकूणच विरोधी पक्षाची कचखाऊ भूमिका, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मतदारांनी ठेवलेला विश्‍वास यामुळे पुण्यात कमळ फुलले आणि संसद ते महापालिकेतपर्यंत शतप्रतिशत भाजप आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा