Pune News : ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

33rd Maharashtra State Police Sports Tournament concludes Maharashtra Police Force Best in Country Devendra Fadnavis

Pune News : ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप

पुणे : महाराष्ट्राच्या पोलिस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलिस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलिस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्यामुळे राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुण्यातील वानवडी येथे आयोजित ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा-२०२३ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर,

पोलिस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) संजय कुमार, अतिरिक्त महासंचालक अनुप कुमार सिंग, पोलिस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, अतिरिक्त महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासह लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी पोलिस दल कार्यरत आहे. विपरीत परिस्थितीत पोलीस कर्मचारी काम करतात. पोलिसांनी कोरोना काळात जोखीम पत्करून प्रचंड काम केले.

त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशाही परिस्थितीत सामान्य माणसाचे जीवन सुकर व्हावे, यासाठी पोलीस दलाने काम केले आहे. पोलिस दलातील क्रीडापटूंसाठी या स्पर्धा महत्वाच्या असून, त्यातून क्रीडा गुणांना वाव मिळतो.

तसेच राष्ट्रीय स्पर्धेतही आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. त्यांनी स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दलही कौतुगोद्गार काढले. पोलिस महासंचालक सेठ म्हणाले, पोलिस खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, संघभावना आणि मनोबल वाढावे यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत.

या स्पर्धेत सहा नवीन विक्रम नोंदले गेले. पुण्यात २८ एकर जागेत पोलीस क्रीडा संकुल आणि होस्टेल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रास्ताविक अनुप कुमार सिंग यांनी केले. आभार पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मानले. या वेळी राज्य राखीव पोलिस बल, प्रशिक्षण केंद्र नानवीज येथील प्रशिक्षणार्थीनी ‘नाईट सायलंट आर्म ड्रील’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

पोलिसांसाठी क्रीडा संकुल उभारणार

पोलिस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल. बालेवाडी येथे खेळासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. परंतु पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यादृष्टीने पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

‘एसआरपीएफ’ला सर्वसाधारण विजेतेपद

या स्पर्धेमध्ये पुरुष गटांत सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलिस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर, प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.