चऱ्होली ते विमानतळ रस्त्यासाठी ३६ कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

महत्त्वाची कामे व तरतूद

  • पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटनुसार दुरुस्ती करणे : ८ कोटी ११ लाख
  • वडमुखवाडी गावठाण सर्व्हे क्र. १२ ते चऱ्होली गावठाण सर्व्हे क्रमांक ४६९ पर्यंतचा डीपी रस्ता विकसित करणे : १ कोटी २५ लाख
  • मोरवाडी, म्हाडा येथील संपूर्ण रस्ते स्मार्ट वॉर्डच्या धर्तीवर अद्ययावत पद्धतीने सिमेंट काँक्रिटीकरण : ७ कोटी ९६ लाख
  • स्मशानभूमीमध्ये स्वच्छता, साफसफाई, देखभाल, सुरक्षा व उद्यानांतील कामांसाठी ठेकेदारी पद्धतीने २४ काळजीवाहक, २४ रखवालदार, सहा माळी असे ५४ कामगार नियुक्त केले जाणार आहेत. त्यांच्या मानधनासाठी येणाऱ्या खर्चासही मंजुरी.

पिंपरी - पुणे-आळंदी पालखी मार्गावरील चऱ्होली फाटा ते पुण्यातील लोहगाव हद्दीपर्यंतच्या विकास आराखड्यानुसार सुमारे ९० मीटर रुंद (विमानतळ) रस्त्याचे काम गावापर्यंत पूर्ण झाले आहे. पठारे मळा, अजिंक्‍य डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसरात काही प्रमाणात काम झाले आहे. उर्वरित कामासाठी ३६ कोटी ३८ लाख रुपयांच्या खर्चास महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. २९) मंजुरी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते. शहरात इतर विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे ९७ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यात मामुर्डी परिसरातील सांडपाणी वाहिन्या व चेंबरच्या देखभाल, दुरुस्तीसाठी ४३ लाख; प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या मानधनासाठी ५८ लाख ६४ हजार; प्रभाग १७ मध्ये विविध कंपन्या व महापालिकेमार्फत खोदलेल्या चरांच्या डांबरीकरणासाठी २९ लाख; प्रभाग १८ मधील महापालिका इमारतीच्या दुरुस्तीसाठी ३७ लाख; प्रभाग ३२ मधील दशक्रिया विधी घाटाच्या नूतनीकरणासाठी ३२ लाख; भोसरी सहल केंद्राच्या नूतनीकरणासाठी ५४ लाख; अजंठानगर व फुलेनगर परिसरातील जल:निसारण व्यवस्था सुधारण्यासाठी ३५ लाख; प्रभाग सातमधील स्थापत्यविषयक कामांसाठी २७ लाख; प्रभाग १९ मधील स्थापत्यविषयक कामांसाठी २८ लाख; ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विद्युत कामांसाठी ३८ लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

चाकणमध्ये कांदा २० रुपये किलो

कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी, सांगवीतील जलनि:सारण कामांसाठी ४७ लाख; ज्योतिबानगर व रुपीनगर परिसरातील जलनि:सारण कामांसाठी ५८ लाख; प्रभाग २५ मधील गणेश भाजी मंडई ते प्रभात कॉलनी दत्तमंदिर रस्त्यावर जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी ४२ लाख; थेरगाव येथील कुणाल रेसिडेन्सी ते पवना नदीवरील चिंचवड पुलापर्यंत जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी एक कोटी ८६ लाख रुपयांच्या खर्चाच्या कामांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 crore for charholi to airport road