esakal | रेशनवर धान्य घ्या मोफत; जिल्ह्यातील ३७ लाख नागरिकांना मिळणार मोफत धान्य

बोलून बातमी शोधा

Ration Card
रेशनवर धान्य घ्या मोफत; जिल्ह्यातील ३७ लाख नागरिकांना मिळणार मोफत धान्य
sakal_logo
By
अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांमधून एप्रिल किंवा मे यापैकी एका महिन्याचे मोफत धान्य वितरणास सुरवात झाली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ३७ लाख नागरिकांना लाभ मिळणार आहे. अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या प्रत्येकी दोन रुपये प्रतिकिलो गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय नुकताच घेतला. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार प्रशासनाने मोफत गहू, तांदूळ देण्याबाबत तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, एप्रिल महिन्यात बहुतांश शिधापत्रिकाधारकांनी पैसे देऊन धान्य घेतले आहे. त्यांना मे महिन्यातील धान्य मोफत मिळणार आहे. तसेच, ज्यांनी या महिन्यात अद्याप धान्य घेतलेले नाही, त्यांना एप्रिल किंवा मे महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ

एप्रिलचे धान्य यापूर्वीच रेशन दुकानांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मे महिन्याचे धान्यही सरकारी धान्य गोदामांमधून चार दिवसांत रेशन दुकानांवर उपलब्ध होइल. धान्याचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांनाच एप्रिल किंवा मे यापैकी एका महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे.

- भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी

पंतप्रधान योजनेतील मागील नोव्हेंबर महिन्याचा मोफत तांदूळ आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील चार महिन्यांची डाळ अद्याप मिळालेली नाही. हेही धान्य सरकारने उपलब्ध करून द्यावे. शहरात एप्रिल महिन्यातील धान्य वितरण जवळपास झाले आहे. त्यामुळे मे महिन्यातच मोफत धान्य वितरित करण्यात येईल. तसेच, रेशन दुकानदारांसाठी कोविड विमा संरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास एक मेपासून रेशन दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- गणेश डांगी, शहराध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

अन्नसुरक्षा योजनेची स्थिती : (पुणे, पिंपरी चिंचवड शहर)

  • शिधापत्रिकाधारकांची संख्या - ३ लाख १ हजार ८८६

  • लाभार्थी संख्या - १२ लाख ४३ हजार १४८

  • पुणे जिल्हा ग्रामीण - शिधापत्रिकाधारक संख्या : ५ लाख ३२ हजार

  • लाभार्थी संख्या - सुमारे २४ लाख ७१ हजार