esakal | पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ
पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर इंजक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, मंगळवारी ऑक्सिजनचीही मागणी वाढल्यामुळे त्याचाही तुटवडा निर्माण झाला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात कोविड रुग्णालयांची संख्या सोमवारपर्यंत ५११ होती. त्यात वाढ झाली असून, आता कोविड रुग्णालयांची संख्या ५५० इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी पाच हजार ९०० रेमडेसिव्हीर इंजक्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचे वितरण रुग्णालयांना करण्यात आले आहे. तसेच, मंगळवारी शहर आणि जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात एक हजार ७६० आणि दुसऱ्या टप्प्यात रात्री एक हजार ४८८ रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.

हेही वाचा: खळबळजनक! इस्लामपुरात रस्त्यावर विनाकराण फिरणारे 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

ऑक्सिजनचाही तुटवडा

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी ३५० मेट्रिक टनांपेक्षा अधिक वाढली आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे मंगळवारी ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली. त्यातच उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांना ऑक्सिजन कमी प्रमाणात पुरवठा झाला. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे हाल झाले. ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांच्या ठिकाणी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कंपन्यांमधून ऑक्सिजनचे वितरण होणार आहे.

सध्या पुणे जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा सुरू आहे. परंतु ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील जिंदाल कंपनीकडून ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा मागविण्यात आला आहे. ऑक्सिजनचे वितरण व्यवस्थित व्हावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात येईल.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी