बारामतीतील 117 जणांचे घेतले नमुने अन् त्यातील पॉझिटिव्ह रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

शहर व परिसरातील कालपर्यंत घेतलेल्या 117 नमुन्यांपैकी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

बारामती : शहर व परिसरातील कालपर्यंत घेतलेल्या 117 नमुन्यांपैकी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. कोरोनामुक्त झालेल्या बारामतीत नियमित कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने बारामतीकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कालपर्यंत संशयित 117 जणांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 69 पर्यंत गेली असून चार रुग्णांचा एप्रिलपासून आजपर्यंत मृत्यू झाला आहे तर 29 रुग्ण बरे झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत कालपासून लॉकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली असून, 20 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी 23 पर्यंत शिथिलता दिली जाणार आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचा संपर्क कमी होत असल्याने रुग्णसंख्याही आपोआपच कमी होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. कालपासूनच हा वेग कमी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. चार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन जणांना कोणतीही लक्षणे नसून ज्या एका रुग्णाला लक्षणे आहेत. तो मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. काही कामानिमित्त बारामतीत आल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याची तपासणी करण्यात आली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, बाहेरगावाहून येणाऱ्यांमुळे कोरोनाची लागण वेगाने होत आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात कोणतीही बाहेरची व्यक्ती कोठूनही आल्यास त्याची कल्पना प्रशासनाला द्यायला हवी, आसपासच्या लोकांनीही नवीन व्यक्ती आपल्या सोसायटी किंवा परिसरामध्ये बाहेरगावाहून आल्यास त्याची माहिती प्रशासनास कळविणे गरजेचे आहे, जेणेकरुन त्यांची वैद्यकीय तपासणी करणे सोपे होईल, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

(Edited By : Krupadan Awale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 New COVID 19 infected patients found in Baramati Pune