Indapur News : रेडा येथे कामाच्या ठिकाणी बंधक करुन ठेवण्यात आलेल्या 41 जणांची सुटका; मुकादामासह ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल

इंदापूर तालुक्यातील रेडा येथे कामाच्या ठिकाणी बंधक करुन ठेवण्यात आलेल्या 22 मजुर आणि 19 बालकांसह 41 जणांची सुटका करण्यात यश.
labour release
labour releasesakal
Updated on

इंदापूर - इंदापूर तालुक्यातील रेडा येथे कामाच्या ठिकाणी बंधक करुन ठेवण्यात आलेल्या 22 मजुर आणि 19 बालकांसह 41 जणांची सुटका करण्यात यश आले असून, याप्रकरणी मजुरांच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पुणे जिल्हाधिकारी व उपायुक्त कामगार कल्याण मंडळ यांना पत्रव्यवहार करीत कार्यवाहीची विनंती केली. यावर वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनांवरून इंदापूरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी संबंधित कामगारांना बंधमुक्त करीत पोलीस स्टेशन येथे हजर केले. यावरून मुकादामासह ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.

labour
laboursakal

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप ताराचंद ठाकरे व इतर (रा. कन्नड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे 25 मार्च रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुरूप त्यांच्या परिवारातील व्यक्ती हे ऊसतोडीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर, 2024 पासून मुकादम नामे रघुनाथ धनाजी सोनवणे व इंदापूर तालुक्यातील ट्रॅक्टर मालक यांच्यासोबत इंदापूर तालुक्यात गेले होते.

मुकादम रघुनाथ धनाजी सोनोणे व ट्रॅक्टर मालक यांनी कामावर जाण्याअगोदर सर्व मजुरांना एकत्रित 11 कोयते मिळून 12 लाख रुपये उचल दिलेली होती. आजपर्यत कामावर 6 महिने होत आले आहेत. परंतु त्यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा हिशोब करुन कोणत्याही प्रकारचा मोबदला ट्रॅक्टर मालकाकडून देण्यात आलेला नाही.

तसेच सर्व लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करीत नाही व जनावरांना सुध्दा चाऱ्याची सोय करुन देत नसल्याने, एका गायीचा मृत्यू झालेला आहे. ट्रॅक्टर मालक मजुरांकडून 8 लाख रुपयाची मागणी करत असून, पैसे न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे.

यामध्ये 11 कायते (22 मजुर) व 19 लहान मुले अशी एकूण 41 लोक यामध्ये फसलेली आहेत. सदर लोकांना ट्रॅक्टर मालक यांच्याकडून सोडवून देण्यात यावे, तसेच मुकादम रघुनाथ धनाजी सोनोणे व ट्रॅक्टर मालक यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केली होती.

त्यानुरूप जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी व कामगार उपायुक्त यांना पत्र लिहीत कार्यवाहीची विनंती केली. त्यानुरुप बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जीवन बनसोडे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी रेडा येथील संबंधित ठिकाणी भेट देत सर्व मजुरांची पोलीस बंदोबस्तात सुटका केली व त्यांना इंदापूर पोलीस स्टेशन येथे आणले.

त्यानंतर विष्णु नारायण गायकवाड (वय-31 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. नेवपुर, ता. कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 11 फेब्रुवारी 25 ते 26 मार्च 2025 च्या दरम्यान मुकादम रघुनाथ धनाजी सोनवणे याने संजय पांडुरंग देवकर याचेकडुन उस तोड करण्यासाठी पैसे घेवुन मी पैसे घेवुन येइपर्यंत तुम्ही येथे राहा, असे सांगुन निघुन गेला तो परत आला नाही.

तसेच शेतकरी संजय पांडुरंग देवकर व विकास संजय देवकर यांनी आम्हाला नजर कैदेत ठेवले, कोठेही जायचे झाले तर आमचेवर नजर ठेवत, आम्हाला काठीने पायावर, नितंबावर मारायचे म्हणून झालेल्या त्रासाबद्दल व मारहाणीबाबत रघुनाथ धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर, विकास संजय देवकर यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलमे वाढवण्याची मागणी..

आम्हाला प्रशासनाकडून याबाबत सहकार्य होत आहे. मात्र आरोपींवरती ज्याप्रमाणे गुन्हा घडला त्याप्रमाणे कलमे लावून कारवाई होणे आवश्यक आहे. यामध्ये वरील सर्व मजूर हे आदिवासी भिल्ल जमातीचे असून यामध्ये दोन महिला गरोदर आहेत. तसेच दोन महिलांची तीन ते चार महिन्यांची बालके आहेत. अशा सर्वांना मारहाण करणे, उपाशी पोटी ठेवणे, बाल कामगार कलम, आदिवासी असल्याने त्याबाबतचे वेगळे कलम लावून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.

- ॲड. वीरसेन काजळे (मुंबई) सामजिक संघटनेचे कायदेविषयक सल्लागार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com