आता पुण्यात सिग्नल पडणार नाहीत बंद; कारण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

- गर्दीच्या ठिकाणचे सिग्नल 24 तास राहणार सुरू 

पुणे : महापालिकेकडून शहरामधील 42 सिग्नल बॅटरी व इन्व्हर्टटरवर कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे वीज गेल्यानंतरही सिग्नल यंत्रणा सुरू राहणार आहे. वाहतूक पोलिसांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. शहरातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या चौकांमध्ये 42 बॅटरी व्यवस्था बसविण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरामध्ये तब्बल 242 सिग्नलच्या माध्यमातून वाहतूक नियमन केले जाते. मात्र, वीज गेल्यानंतर सिग्नल यंत्रणा बंद पडून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो. परिणामी वाहतूक पोलिसांनाही चौकाचौकामध्ये उभे राहून हातावर वाहतूक नियमन करावे लागते. विशेषतः सकाळी व सायंकाळी ऐन रहदारीच्यावेळी वीज गेल्यास वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या इलेक्‍ट्रिकल विभागाकडून शहरातील सर्वाधिक गर्दी असणारे चौकांची पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणच्या सिग्नलला बॅटरी व इन्व्हर्टर बसविण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. संबंधित सिग्नल आता 24 तास सुरू राहणार असल्याचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.

'हुकुमशाहीला अहिंसेने उत्तर देऊ'

दरम्यान, वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधून संबंधित ठिकाणच्या सिग्नलच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. 

जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शिवाजीनगर, बोपोडी, कात्रज डेअरी चौक, खंडुजीबाबा चौक, स्वारगेटचा जेधे चौक, बुधवार पेठ, पूरम चौक, टिळक चौक, येरवडा, वडगाव उड्डाणपूल, विमाननगर, शास्त्रीनगर, कात्रज बाह्यवळण, खराडी बाह्यवळण चौक, मंतरवाडी फाटा चौक, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक अशा 42 ठिकाणी बॅटरी व इन्व्हर्टर बसविण्यात आले आहेत. संबंधित सिग्नल 24 तास सुरू राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 Signal will Remain on in Various Areas of Pune