अटक टाळण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच; सहायक पोलिस निरीक्षकासह पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

50 thousand bribe avoid arrest case registered against police constable along with assistant police inspector pune

अटक टाळण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच; सहायक पोलिस निरीक्षकासह पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषारोपत्रात मदत करण्यासाठी तसेच अटक न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे व पोलिस शिपाई अभिजीत विठ्ठल पालके अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार तरुण व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध त्याच्या पत्नीने कोंढवा पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील दोषारोपपत्रात मदत करणे तसेच आई, वडील आणि बहिणीला अटक न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली होती. तरुणाने याबाबत तक्रार दिल्यानंतर "एसीबी'कडून चौकशी करण्यात आली. संबंधित चौकशीत पोलिस शिपाई पालके याने लाच मागितल्याचे उघडकीस आले. तर दगडे यांनी त्याला लाच मागण्यासाठी सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.