esakal | पुणे महापालिकेकडून सवलतीतील ‘डायलिसिस’चा ५० हजार रुग्णांना लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

Dialysis
पुणे महापालिकेकडून सवलतीतील ‘डायलिसिस’चा ५० हजार रुग्णांना लाभ

पुणे महापालिकेकडून सवलतीतील ‘डायलिसिस’चा ५० हजार रुग्णांना लाभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिस करण्यासाठी पाच हजारांपर्यंत खर्च येतो. तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना परवडत नसल्याने महापालिकेतर्फे सामाजिक संस्थांच्या मदतीने दोन रुग्णालयांत डायलिसिस केंद्र सुरू केले. त्यांचा आतापर्यंत सुमारे ५० हजार जणांनी लाभ घेतला आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता आणखी दोन ठिकाणी केंद्र सुरू केले जाणार आहे.

मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत औषधे खावी लागतात. त्याचा परिणाम रुग्णांच्या किडनीवर होऊन तिची कार्य करण्याची क्षमता मंदावते. काही रुग्णांची किडनी तर पूर्णपणे निकामी होते. त्यामुळे रक्तातील घातक घटक वाढल्याने जिवाला धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी रुग्णांना डायलिसिस करणे आवश्‍यक असते.

शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ हजारांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाते. आजार गंभीर असेल, तर काही जणांना आठवड्यातून दोन वेळा किंवा पंधरा दिवसांतून एकदा डायलिसिस करावे लागते. किडनीचे काम योग्य पद्धतीने जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत ठरावीक दिवसांनी डायलिसिस करण्यासाठी जावे लागते. त्यामुळे होणारा खर्च आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना परवडणारा नसतो. अशा नागरिकांसाठी महापालिकेने पाच वर्षांपूर्वी कमला नेहरू रुग्णालयात रोटरी क्लबच्या मदतीने पहिले डायलिसीस केंद्र सुरू केले. त्यानंतर सुमारे दीड वर्षापूर्वी येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात देखील ही सुविधा अल्पदरात उपलब्ध करून दिली. शहराच्या सर्व भागात डायलिसिस केंद्र सुरू करण्याची मागणी होत असल्याने त्यात आता आणखी दोन केंद्रांची भर पडणार आहे. यामध्ये आंबेगाव बुद्रुक येथील रखमाबाई तुकाराम थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वारजे येथील बारटक्के रुग्णालयात प्रत्येकी १० बेडचे डायलिसिस केंद्र सुरू केले जाणार आहे.

हेही वाचा: MPSC परिषद : ‘बिनधास्त बोला’तून दबलेल्या प्रश्नांना मिळालं व्यासपीठ

महापालिकेकडून डायलिसिस मशिन उपलब्ध

डायलिसिस केंद्रासाठी महापालिकेकडून जागा, मशिन, बेड आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. संबंधित संस्थेकडून डॉक्टर, नर्स पुरविल्या जातात. थोरवे व बारटक्के रुग्णालयात प्रत्येकी चार मशिन महापालिका देणार आहे. उर्वरित १२ मशिन संबंधित संस्थांकडून उपलब्ध केल्या जाणार असल्याचे डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

या ठिकाणी सुविधा

  • कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ

  • राजीव गांधी रुग्णालय (येरवडा)

  • प्रत्येकी १० उपलब्ध बेड

  • ४०० रुपये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शुल्क

प्रस्तावित केंद्र

  • रखमाबाई तुकाराम थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेगाव बुद्रूक

  • बारटक्के रुग्णालय (वारजे)

  • प्रत्येकी १० उपलब्ध होणारे बेड

कमला नेहरू व राजीव गांधी रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये डायलिसिस केंद्र सुरू आहे. एका दिवसात या केंद्रावर प्रत्येकी २० रुग्णांचे डायलिसिस केले जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी ही सुविधा ४०० रुपयांत उपलब्ध करून दिली जात आहे. शहरी गरीब योजनेतून डायलाइट ट्युबिंग आणि रक्तवाढीचे इंजेक्शन दिले जात असल्याने रुग्णांच्या खर्चात बचत होत आहे.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख

loading image
go to top