कोरोना रुग्णांना दिलासा ! पुण्यातील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 56 टक्के बेड उपलब्ध

56 percent beds available in private hospitals in Pune
56 percent beds available in private hospitals in Pune

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाइकांना करावी लागणारी धावपळ आता संपली आहे. तुम्हाला किंवा तुमच्या नात्यातील, ओळखीच्या कोणालाही कोरोनाचे निदान झाले तरीही घाबरून जाऊ नका. रुग्णाला रुग्णालयातील आवश्‍यक खाट नक्की मिळेल, असा दिलासा पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे कारण पुण्यात सध्या 56 टक्के खाटा रिक्त आहेत. 

कोरोना उद्रेकात गेल्या दोन महिन्यांपासून पुणेकरांनी अभूतपूर्व स्थिती अनुभवली. कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत होती. अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नव्हता. बेड मिळालेल्या रुग्णांना पुरेसा ऑक्‍सिजन मिळण्यासाठी रुग्णालयाला धावपळ करावी लागल होती. या सर्व प्रक्रियेत रुग्णाच्या नातेवाइकांची दमछाक होत होती. आता कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी राखीव ठेवलेल्या खाटा आता रिक्त होऊ लागल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. 

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी प्रशासनातर्फे "डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल' (डीसीएच) आणि "डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर' (डीसीएचसी) सुरू केली होती. त्या अंतर्गत काही खासगी रुग्णालयांमधील खाटांचे कोरोनाबाधित रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यात आले होते. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून रुग्णांनी भरलेल्या या खाटा आता रिक्त होऊ लागल्याची माहिती कोविड हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी दिली. पुण्यातील तीन हजार 206 खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यापैकी 56 टक्के खाटा रिक्त आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ससूनमध्ये संख्या कमी 
ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 547 खाटा राखीव ठेवल्या आहेत. त्यापैकी सध्या फक्त 150 रुग्ण दाखल आहेत. उर्वरित 397 (73 टक्के) खाटा रिक्त आहेत, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली. ते म्हणाले, ""गेल्या दोन महिन्यांपूर्वी या सर्व खाटा भरलेल्या होत्या. त्यानंतरही रुग्ण उपचारांसाठी दाखल होत होते. ही स्थिती गेल्या काही दिवसांपासून बदलत आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिसत आहे. त्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्यातून रिक्त खाटांची संख्या वाढत आहे.'' 

डॉक्‍टरांवरचा ताण कमी 
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांवरील ताण कमी झाला आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीनचे (आयएससीसीएम) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबाल दीक्षित यांनी सांगितले. ते म्हणाले, ""रुग्णांची संख्या कमी झाली, याचा अर्थ आता धोका टळला, असे निश्‍चित होत नाही. मास्क, सोशल डिस्टसिंग याचा वापर करावाच लागेल. कारण, युरोपात आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''हिवाळा आणि सणासुदीचे दिवस ही दोन आव्हाने आता आपल्या पुढे आहेत. या काळात मास्क, सोशल डिस्टसिंग आणि सॅनिटाझर याचा सातत्याने वापर करून कोरोनाला प्रतिबंध केला पाहिजे. त्यातून आपल्याला कोरोनाचा उद्रेक नियंत्रित ठेवता येईल.''
-डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय 

''शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे दिसते. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळण्यात अडथळे येत नाहीत. तसेच, कोरोनासाठी राखीव रुग्णालयांमधून आता नॉन कोविड रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला आहे.''
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com