पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्रीतून ५६९ कोटींचा महसूल जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Property Revenue

पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या दिवाळीत ५६८ कोटी ८९ लाख रुपयांचा महसूल हा मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला मिळाला आहे.

पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्रीतून ५६९ कोटींचा महसूल जमा

पुणे - पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या दिवाळीत ५६८ कोटी ८९ लाख रुपयांचा महसूल हा मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला मिळाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आक्टोबरमध्ये मुद्रांक शुल्कातून मिळणाऱ्या रकमेत २० कोटी ८६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षातील शहरातील निश्‍चित उदिष्टापैकी ६०.४२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मुद्रांक शुल्काच्या जमा रकमेच्या सप्टेंबरच्या तुलनेत फक्त दिवाळीत १०.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

घर, सदनिका किंवा मोकळ्या जागा खरेदी करण्यासाठी नागरिक दसरा किंवा दिवाळीचे मुहूर्त साधत असतात. यानुसार यंदाच्या दसरा आणि दिवाळीत पुणेकरांनी हा मुहूर्त साधण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यातूनच यंदाच्या दस-दिवाळीत शहरातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कातून मोठा महसूल जमा झाला असल्याचे राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक शुल्क कार्यालयातून सांगण्यात आले. पुणे शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून चालू आर्थिक वर्षात एकूण ५ हजार ८८० कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीसाठीचे हे उद्दिष्ट आहे. यापैकी आक्टोबर अखेरपर्यंत ३ हजार ५४४ कोटी ३५ लाख रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मुद्रांक शुल्क विभागाला यश आले आहे.

दरम्यान, पुणे शहरातून आर्थिक वर्ष सुरु झाल्यापासून पहिल्या सहा महिन्यात (सप्टेंबरअखेरपर्यंत) मुद्रांक शुल्कातून एकूण २ हजार ९३२ कोटी ७० लाख रुपयांचा निधी जमा झाला होता. जमा महसुलाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४९.८८ टक्के इतके होते. त्यात आक्टोबरमध्ये आणखी १०.५४ टक्क्यांची भर पडली आहे.

शहरातील मालमत्ता व्यवहार स्थिती

- पहिल्या सहा महिन्यात झालेली एकूण दस्तनोंदणी --- १ लाख २५ हजार ९९९

- सप्टेंबर महिन्यातील दस्तनोंदणी --- १९ हजार ७२५

- आक्टोबर महिन्यात झालेली दस्तनोंदणी --- १९ हजार ३५६

- आक्टोबर अखेरपर्यंतची एकूण दस्तनोंदणी --- १ लाख ४७ हजार १३०

- शहरातील मुद्रांक शुल्क जमासाठीचे वार्षिक उद्दिष्ट --- ५ हजार ८८० कोटी रुपये.

- आजअखेर जमा झालेला महसूल --- ३ हजार ५४४ कोटी ३५ लाख रुपये.

टॅग्स :punepropertysaleRevenue