मेट्रोसाठी सहा हजार कोटींचे कर्ज

Metro
Metro

पिंपरी - युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक आणि एएफडी फ्रान्स या दोन बॅंकांकडून पुणे मेट्रोसाठी सहा हजार कोटी रुपये कर्ज मिळणार असून, त्याची प्रक्रिया येत्या मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी साठ टक्के रक्कम कर्जाद्वारे उपलब्ध करायचे ठरले होते. दोन विदेशी बॅंकांमार्फत ती रक्कम मिळणार असल्यामुळे, या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली रक्कम उभी राहणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते रेंजहिल्स या मार्गावर प्राधान्याने काम करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यासाठी महापालिका भवनालगत असलेल्या अहल्यादेवी होळकर चौकाजवळ बांधण्यात येत असलेल्या मेट्रो स्थानकाच्या कामाला गती देण्यात आली आहे. 

वल्लभनगर एसटी स्थानकाजवळील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकाचे कॉनकोर्स प्लॅटफॉर्मसाठी पिलर आर्मचे काम पूर्ण होत आले आहे, तर फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकासाठी तीन पिलर आर्म बसविण्याचे काम सुरू झाले आहे. मेट्रो या तीन स्थानकादरम्यान पहिल्यांदा धावणार आहे. 

पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम म्हणाले, ‘‘रेंजहिल्स ते न्यायालय यादरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मेट्रोसाठी केबल बसविण्याच्या कामाचे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत. जानेवारीमध्ये लोहमार्गाच्या निविदा मंजूर केल्या जातील. रेंजहिल्स व कोथरुड डेपो येथील मेट्रोच्या डेपोच्या निविदा जानेवारीअखेरीस मंजूर केल्या जातील. सिग्नलच्या निविदाही मार्चपूर्वी मंजूर केल्या जातील. त्यामुळे, मेट्रोच्या डेपोचे, तसेच चारही मार्गाचे काम सुरू होईल. पुढील तीन वर्षांत मेट्रोची सर्व कामे पूर्ण होतील.’’

पादचारी पूल हटविणार
खराळवाडी ते संत तुकारामनगर स्थानकापर्यंत व्हायाडक्‍टचे काम पूर्ण झाले आहे. या स्थानकावरील खांबांवर कॅप बसविल्यानंतर तेथील सध्याचा पादचारी पूल हटविण्यात येईल. त्यानंतर स्थानकावरील व्हायाडक्‍टचे काम पूर्ण करीत गर्डर लाँचर नाशिकफाट्याच्या दिशेने जाईल. खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या पंधरवड्यानंतर तेथून संत मदर तेरेसा पुलापर्यंत व्हायाडक्‍टचे स्पॅन बसविण्यास प्रारंभ होईल. दरमहा व्हायाडक्‍टचे पंधरा ते वीस स्पॅन पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महामेट्रोला ८४५ मिलियन युरो म्हणजे सहा हजार कोटी रुपये कर्ज देण्यासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक आणि एएफडी फ्रान्स या दोन विदेशी बॅंकांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकीत त्याबाबतचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्याबाबत केंद्र सरकारबरोबरची प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ती साठ टक्के रक्कम, तसेच केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी वीस टक्के रक्कम मिळेल. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामांच्या सर्व निविदा मार्चपर्यंत मंजूर होतील. त्यामुळे मेट्रोच्या सर्व मार्गांवरील कामे पुढील वर्षी वेगाने सुरू होतील.
- रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक, पुणे मेट्रो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com