पुणे - महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेला आठ वर्षे झाली, मात्र अद्यापही या योजनेतील पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांचे काम पूर्ण झाले नाही. विविध कारणांमुळे होणाऱ्या विलंबामुळे तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली, तरीही ८६ पैकी ६६ पाण्याच्या टाक्या बांधून झाल्या आहेत. उर्वरित टाक्यांचे कामे पूर्ण होण्यासाठी व पुणेकरांची तहान भागविण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागण्याची चिन्हे आहेत.
शहरातील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी महापालिकेने २०१६ मध्ये समान पाणीपुरवठा योजनेत विविध भागांत ८६ पाणी साठवण टाक्या बांधण्याचे निश्चित केले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून संबंधित काम केले जात आहे. २०१६ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम विविध कंपन्यांना देण्यात आले.
त्यानुसार, संबंधित कंपन्यांनी अडीच वर्षांमध्ये पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण करण्याची आवश्यकता होती. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे टाक्या बांधण्याच्या कामाला फटका बसला. या कामाला गती मिळण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मार्च २०२५ पर्यंत टाक्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागाने ठेवले होते. मात्र त्याला यश आले नाही.
टाक्यांचे काम का रखडले?
१) योजनेचे काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांतच या कामाला कोरोनाचा फटका बसला.
२) टाक्यांना जागा मिळण्यासाठी वन व जलसंपदा विभाग, रेल्वे, कॅंटोन्मेंट अशा विविध विभागांच्या परवानगीसाठी आणखी विलंब. त्यामुळे टाक्या बांधण्यास ठेकेदारांचा विरोध.
३) त्यानंतर पुन्हा एकदा जागेचा शोध घेण्यास सुरूवात. एसएनडीटी (विधी महाविद्यालय रस्ता) येथील टाकीचे काम न्यायप्रविष्ट असल्याने रखडले आहे, तर खैरेवाडी व चिखलवाडीत जागा उपलब्ध न झाल्यामुळे येथे टाक्या बांधल्या नाहीत.
समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत ८६ पैकी ६६ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टाक्यांचे काम प्रगतिपथावर आहेत. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत सर्व टाक्यांचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू होईल.
- श्रीकांत वायदंडे, अधिक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर वर्षभर आम्हाला टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. सोसायटीचा टॅंकरवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. सात वर्षांपासून महापालिकेच्या पाण्याची वाट पाहत आहोत, मात्र अजूनही आमच्या सोसायट्यांपर्यंत पाणी पोचलेले नाही.
- अनिल काळे, रहिवासी, सूस
जलवाहिन्यांची स्थिती
१२६८ किमी - जलवाहिन्यांची आवश्यकता
१०८५ किमी - जलवाहिन्यांचे काम पूर्ण
२ लाख ३२ हजार ६६७ - एएमआर मीटर बसविणार
१ लाख ७९ हजार ५१६ - एएमआर मीटर बसविले
५ - नवीन पंपिंग स्टेशन
२१७ कोटी रुपये - टाक्यांच्या कामांसाठी खर्च
टाक्यांबाबतची स्थिती...
८६ - एकूण पाणी साठवण टाक्या
२३ - काम पूर्ण, पाणी वितरण सुरू
५ - जागेअभावी लगतच्या झोनमध्ये टाक्या
६६ - काम पूर्ण
१३ - विविध टप्प्यांवर काम
२ - जागा उपलब्ध नाही
१ - न्यायप्रविष्ट कारणाने रखडले काम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.