चावडीवाचनात पुढे आला सातबारा गोंधळ!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

पुणे - राज्य सरकारने ई-फेरफारची अंमलबजावणी करण्यासाठी सातबारा संगणकीकृत केले आहे. या संगणकीकृत सातबाराच्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ४५ हजारपेक्षा जास्त गटांतील सातबारांवरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील जमिनीच्या क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. एकच जमीन दोन किंवा तीनदा विकल्याने हा प्रकार घडला असल्याचे तपासणीमध्ये समोर आले आहे.

पुणे - राज्य सरकारने ई-फेरफारची अंमलबजावणी करण्यासाठी सातबारा संगणकीकृत केले आहे. या संगणकीकृत सातबाराच्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ४५ हजारपेक्षा जास्त गटांतील सातबारांवरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील जमिनीच्या क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. एकच जमीन दोन किंवा तीनदा विकल्याने हा प्रकार घडला असल्याचे तपासणीमध्ये समोर आले आहे.

राज्यभरात ई-फेरफारची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सातबारा संगणकीकृत करण्यात येत आहेत. यामध्ये संगणकीकृत सातबारा उतारे हे हस्तलिखित सातबारा उताऱ्यांशी शंभर टक्के जुळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी गावनिहाय जाहीर चावडीवाचन सुरू झाले आहे. त्यामध्ये काही सातबारा उतारे हे संगणकीकृत सातबारा उताऱ्यांशी तंतोतंत जुळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिरूर तालुक्‍यातील सातबारांमधील तफावतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

तुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठ्यांची नोंद होत नाही, तसेच जागा विकताही येत नाही. मात्र मूळ जमीनमालक, विकसक मध्यस्थांद्वारे एक ते दोन गुंठे जागांची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली आहे.

स्वस्तात जागा मिळत असल्याने नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्या आहेत. आर्थिक गुंतवणूक आणि घर बांधण्याच्या हेतूने प्रत्यक्षात जागेची पाहणी न करता केवळ सातबारा पाहून जागा खरेदी केल्याचे दिसून आले आहे. दबावाखाली तलाठ्याद्वारे नाव सातबारावर लावले, तरी मूळ सातबारावरील एकूण क्षेत्र आणि प्रत्यक्षात जागेवरील क्षेत्रामध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे एकच जागा अनेकांना विकल्याचे धक्कादायक प्रकार या चावडीवाचन उपक्रमांमध्ये उघडकीस येत आहेत.
 

सातबारा चावडीवाचन मोहिमेमध्ये अनेक सातबारांमध्ये चुका असल्याचे समोर आले आहे. काही जणांनी एकच जमीन एकापेक्षा अधिक जणांना विकल्यामुळे सातबारावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील जमिनीचे क्षेत्र यामध्ये तफावत आढळत आहे. या मोहिमेमध्ये सातबारा उताऱ्यांमधील चुका या तलाठी आणि तहसीलदार पातळीवर दुरुस्त केल्या जातील. दरम्यान, नागरिकांनी जमीन खरेदी करताना सर्च रिपोर्ट, फेरफार कागदपत्रांची शहानिशा करूनच खरेदी करावी, जेणेकरून फसवणूक टाळली जाईल. 
- रमेश काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7/12 confussion