Farmer Compensation : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटींची नुकसान भरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

73 crore compensation to farmers affected heavy rains agriculture

Farmer Compensation : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटींची नुकसान भरपाई

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

अतिवृष्टीमध्ये किमान ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आॅनलाईन पद्धतीने या नुकसान भरपाईचे वाटप सुरु कऱण्यात आले असून आतापर्यंत ८० टक्के वाटप पूर्ण झाले आहे. याचा जिल्ह्यातील ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी सांगितले.

दरम्यान, यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४ गावांतील १ हजार ४३४ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ४०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी ७० लाख ७० हजार रुपयांचे अनुदानाची मागणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील ७८ गावांमधील ५२३ शेतकऱ्यांना २३ लाख १० हजार रुपये, वेल्हे तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना ३९ हजार रुपये, मावळ तालुक्यातील ११४ शेतकऱ्यांना ३ लाख २६ हजार रुपये,

हवेली तालुक्यातील ७ हजार ४९० शेतकऱ्यांना ८ कोटी ३३ लाख २ हजार रुपये, खेड तालुक्यातील १ हजार ९४७ शेतकऱ्यांना २ कोटी २ लाख २३ हजार रुपये, आंबेगाव तालुक्यातील ९ हजार ७७९ शेतकऱ्यांना ४ कोटी ९६ लाख ६९ हजार रुपये, जुन्नर तालुक्यातील २२ हजार ५९१ शेतकऱ्यांना २४ कोटी ५१ लाख ४६ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

शिरूर तालुक्यातील ४ हजार ७३४ शेतकऱ्यांना ४ कोटी ५६ लाख ६६ हजार रुपये, पुरंदर तालुक्यातील २७ हजार ८४१ शेतकऱ्यांना २१ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये, दौंड तालुक्यातील २ हजार ८ शेतकऱ्यांना २ कोटी १४ लाख ८० हजार रुपये, बारामती तालुक्यातील ८ हजार ४१७ शेतकऱ्यांना ५ कोटी ५२ लाख २० हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याशिवाय जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीसाठी ३ कोटी १४ लाख २१ हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख ६४ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

टॅग्स :Pune NewsFarmer