
पुणे : ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचे अमेरिकेतील विविध शहरांमध्ये होणारे प्रयोग... नाटकाचा सेट वैशिष्ट्यपूर्ण असल्याने प्रत्येक शहरात उभा करणे शक्य नाही. मग एकाच शहरात उभा केलेला सेट सगळ्या शहरांमध्ये फिरवायचे ठरते. पण विमा नसणे, सलग प्रवास नसणे यामुळे सेटची वाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी चालकच मिळेना. अखेर या प्रयोगांचे अमेरिकेत आयोजन करणारे शैलेश शेट्ये यांनीच सारथ्य करायचे ठरविले आणि २४ दिवसांच्या या दौऱ्यात नाटकाचा सेट असलेला हा ट्रक १० शहरांमधून तब्बल साडेआठ हजार किलोमीटर स्वतः चालवत घेऊन गेले.मराठी माणसांच्या रंगभूमीवरील प्रेम आणि ध्यासाची प्रचिती महाराष्ट्रात तर नेहमीच येत असते. मात्र शेट्ये यांच्या निमित्ताने सातासमुद्रापार अमेरिकेतही याच नाट्यध्यासाचे उदाहरण पाहायला मिळाले. त्यांच्या या जिद्दीमुळेच ‘वाडा चिरेबंदी’ या अभिजात नाटकाचे प्रयोग त्याच्या मूळ नेपथ्यासह अतिशय देखणेपणाने अमेरिकेतील रसिकांसमोर सादर झाले. लॉस एंजेलिस येथे राहाणारे शेट्ये यांनी त्यांच्या ‘फाइव्ह डायमेन्शन’ या संस्थेतर्फे या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत आयोजित केले होते.