उजनी धरणाखालील नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

डॉ. संदेश शहा
Friday, 28 August 2020

पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणात आज (ता. 28) 112.62 टीएमसी पाणी असून, धरणातील पाण्याची टक्केवारी 91.40 टक्के इतकी आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा 48.96 टीएमसी आहे.

इंदापूर (पुणे) : पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणात आज (ता. 28) 112.62 टीएमसी पाणी असून, धरणातील पाण्याची टक्केवारी 91.40 टक्के इतकी आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा 48.96 टीएमसी आहे. धरणाखालील  नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा

या पावसाळ्यात भीमा खोऱ्यातील कळमोडी, आंद्रा, मुळशी, वरसगाव, पानशेत, वीर, नाझरे, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, नीरा देवधर ही धरणे 100 टक्के भरली असून, पिंपळगाव जोगे धरण 34 टक्के, माणिकडोह 38.55 टक्के, येडगाव 90.23 टक्के, वडज 91.42 टक्के, डिंभे 94.94 टक्के, घोड 90.30 टक्के, विसापूर 44.75 टक्के, चासकमान 96.31 टक्के, भामा आसखेड 84.64 टक्के, वडिवळे 85.65 टक्के, पवना 92.56 टक्के, कासारसाई 99.44 टक्के, टेमघर 88.49 टक्के भरले आहे. ही धरणे भरल्यानंतर पावसाचे पडणारे पाणी भीमा नदीतून उजनी धरणात येते. त्यामुळे उजनी धरणाच्या पुणे जिल्हा लाभक्षेत्रात पडणारे पाणी उजनी धरणात येऊन धरण आठवडाभरात संपूर्ण क्षमतेने भरेल, अशी माहिती धरण व्यवस्थापन सूत्रांनी दिली.

बारामतीकरांसाठी मोठी बातमी, टोलबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

उजनी धरणात मागील वर्षी या दिवशी एकूण पाणीसाठा 120.22 टीएमसी, तर उपयुक्त पाणीसाठा 56.57 टीएमसी व पाणी टक्केवारी 105.59 टक्के होती. त्या तुलनेत धरणात सुमारे 14 टीएमसी पाणी कमी असले, तरी यंदा धरण निश्चित भरणार आहे. त्यामुळे या परिसरात मोठे आर्थिक परिवर्तन होणार आहे. उजनीचे पाणी प्रदूषण रोखणे, ही काळाची गरज आहे. नीरा भीमा कृष्णा स्थिरीकरण प्रकल्प पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.

उजनीतील पाण्यामुळे 40 साखर कारखाने, 10 औद्योगिक वसाहती, लाखो हेक्टर शेती व शेतीपूरक व्यवसायास नवीन ऊर्जा मिळाली आहे. यंदा उजनी धरण कार्यक्षेत्रात उसाचे विक्रमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना हा हंगाम कसोटीचा ठरणार आहे. त्यामुळे कोरोना अनलॉकच्या पार्श्वभूमीवर कारखाने कधी सुरू होणार, याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 91% water storage in Ujani dam