esakal | उत्सव वैश्विक चिंतनाचा, जनकल्याणाचा, लोकजागराचा!
sakal

बोलून बातमी शोधा

pune

उत्सव वैश्विक चिंतनाचा, जनकल्याणाचा, लोकजागराचा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आज घरोघरी आगमन होत आहे. ‘कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळू दे,’ अशी कामना व्यक्त करीत पुढील दहा दिवस मंगलमय पर्वाचा उत्साह द्विगुणित होत जाणाऱ्या या सोहळ्याविषयी...

श्रीकांत विष्णू शेटे

अध्यक्ष, मानाचा पहिला श्री कसबा गणपती ,

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे

समाज म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र जगलं पाहिजे, मतभेद असले तरीही तेवढे काही मुद्दे सोडून बाकी सामाजिक अभिसरण घडलं पाहिजे, हा विचार घट्ट आणि खोलवर रुजविण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून प्रयत्न झालेले आहेत. ‘मी आणि माझं’ एवढा संकुचित विचार भारतीय संस्कृतीमध्ये नाहीच.

आपल्या घरांच्या रचनेपासून ते नगररचनेपर्यंत सगळीकडे एकच मानसिक तत्त्व दिसतं, ते म्हणजे समाज म्हणून एकसंधता आणि समरसता. व्यक्तींची मनं वेगवेगळी असणार, त्यांचे व्यक्तिगत विचार वेगवेगळे असणार, यात शंकाच नाही. पण, तरीही समाज म्हणून एकत्रित राहणं नितांत आवश्यक आहे, हेही नाकारता येणार नाही. म्हणूनच, माणसांच्या भावना, त्यांच्या प्रेरणा आणि त्यांची कृतिशीलता ह्यांना एकत्रित बांधणं महत्त्वाचं आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हे त्याचंच रूप आहे. हा उत्सव सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झाला तेव्हाही त्याची आवश्यकता होतीच आणि आज सव्वाशे वर्षांनंतरही त्याची तितकीच आवश्यकता आहे, किंबहुना कांकणभर अधिकच.

चार माणसं एकत्र येतात, एका देवाची प्रतिमा स्थापन करतात, दहा दिवस तिची पूजा करतात आणि नंतर तिचं विसर्जन करतात, ह्याला उत्सव म्हणत नाहीत. केवळ लोकांची गर्दी म्हणजे उत्सव नव्हे, केवळ गजबजाट-रोषणाई म्हणजे उत्सव नव्हे आणि केवळ मोठमोठाल्या सजावटी म्हणजेही उत्सव नव्हे. मग उत्सव म्हणजे तरी काय?

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

उत्सवाला एक वेगळं भावनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान आहे. लोकांना उत्तम आयुष्य जगण्यासाठीची ऊर्जा मिळावी, स्वतःच्या प्रगतीसाठी वैचारिक प्रबोधनाची संधी मिळावी, सुष्ट प्रवृत्तींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि मानसिक बळ मिळावं हा या उत्सवामागचा खूप मोठा आणि व्यापक उद्देश आहे. कितीही अडचणी आल्या, संकटं आली, आपल्याला धक्के बसले, पडझड झाली, तरीही आपला आत्मविश्वास मात्र ढासळू नये, यासाठीची ही योजना आहे. घरातल्या देवघरामध्ये देव असतो, त्याची पूजा आपण रोज करतोच. अनेक मंदिरं आहेत, आपण तिथं नित्य दर्शनाला जातोच.

इतकंच काय, आपण हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचीही यात्रा करतो. मग एवढं सगळं असताना उत्सव हवा कशाला? असा प्रश्न मनात येणं स्वाभाविकच आहे. म्हणूनच, त्यामागचं मनोविश्व समजून घ्यायला हवं. उत्सव म्हणजे माणसांना प्रेरणा मिळण्याचा एक फार मोठा स्रोत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कोरड्या आणि रुक्ष व्यवहारांपेक्षा भावनिक ओलावा, आपुलकी, जिव्हाळा यांना महत्त्व जास्त आहे, पण ह्या भावनांना सतत शिंपण करण्याची गरज असते. हेच शिंपण आपल्या सण-उत्सवांमधून होत राहतं. त्याचा कुणी एक कर्ताधर्ता नसतो.

संपूर्ण समाजच उत्सवमय होऊन गेलेला असतो. रांगोळ्यांचे रंग, फुलांचे सुगंध, विद्युत रोषणाईचा झगमगाट, सगळीकडे भक्तीसंगीताचे प्रसन्न सूर हे सगळं वातावरणच असं असतं की, माणसाचं चित्त प्रसन्न होतंच. कारण, त्यात उत्साह वाढवणारा, उत्फुल्ल करणारा जिवंतपणा आहे.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

कोविडप्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढलेला असला तरीही लहान मुलं आणि युवापिढी यांच्यापर्यंत अजूनही लस पोचलेली नाही. साहजिकच, आपल्याला काळजी घेणं आवश्यकच आहे आणि आपण ती घेत आहोत. हे सगळं केवळ शासनाला सहकार्य करण्यासाठी नाही, तर समाजाच्या सर्वांगीण स्वास्थ्य आणि सुरक्षिततेसाठी आहे. ते भान तुम्ही, मी आणि आपण सगळ्यांनीच निरंतर जागृत ठेवलं पाहिजे.

हा देश माझा आहे आणि मी ह्या देशाचा आहे, ही भावना आपल्या मनांमध्ये सदैव जागी राहिली तर आपला देश हा ‘खंबीर मनोवृत्तीच्या माणसांचा देश’ व्हायला वेळ लागणार नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधूया आणि यंदाचा हा गणेशोत्सव अतिशय सुरक्षित वातावरणात, घरी राहून साजरा करू या.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

loading image
go to top