esakal | Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या दा.कृ सोमण यांच्याकडून
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

श्रीगणेशाचे हे गुण आपल्यात यावेत, यासाठी गणेशपूजन करावयाचे असते.

Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- दा. कृ. सोमण

आपल्या आवडत्या गणपती बाप्पांचे आज (ता.१०) सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी मध्यान्हकाळी असेल त्यादिवशी पार्थिव गणेश पूजन करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे. पार्थिव गणेशमूर्ती म्हणजे मातीचीच गणेशमूर्ती पूजायची आहे. उत्सवमूर्ती कसलीही चालेल. परंतु ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे ती मातीचीच मूर्ती हवी. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीची गणेशमूर्तीची पूजा करावयाची आहे.   

हेही वाचा: गणपतीची आरती

शुक्रवार (ता. १०) सप्टेंबर रोजी श्रीगणेशमूर्तीची स्थापना मध्यान्हकाली म्हणजेच सकाळी ११:२१ पासून दुपारी १:४८ पर्यंत करावयाची आहे. परंतु सर्वानाच हे शक्य होते असे नाही म्हणून त्यादिवशी पहाटे साडेपाच वाजल्यापासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत कधीही श्रीगणेशमूर्तीची स्थापना करावी. गणेशमूर्ती लहान असावी परंतु भक्ती व श्रद्धा मोठी असावी. श्रीगणेश हा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो गणांचा नायक आहे. तो मातृ-पितृभक्त आहे. तो सुखकर्ता आहे. तो दु:खहर्ता आहे. श्रीगणेशाचे हे गुण आपल्यात यावेत, यासाठी गणेशपूजन करावयाचे असते.

हेही वाचा: गणरायाबद्दल 'या' काही खास गोष्टी तुम्हांला माहितीयेत का?

श्रीगणेशमूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून देवत्त्व आणले जाते आणि श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तरपूजेचे मंत्र म्हणून देवत्त्व काढले जाते. स्नान करून स्वच्छ धूतवस्त्र नेसून घरातील देव व वडील माणसांना नमस्कार करून पूजेस प्रारंभ करावा. गणेशमूर्तीखाली अक्षता घालून त्यावर गणेशमूर्ती स्थापन करावी.

हेही वाचा: श्री गणपती स्तोत्र

प्राणप्रतिष्ठा- गणेशमूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणावेत. त्याचवेळी मूर्तीत देवत्व आल्याची श्रद्धापूर्वक कल्पना करावी. त्यानंतर षोडशोपचार पूजा करावी.            

यावर्षीही आपली कोरोनाशी लढाई सुरूच आहे. त्यामुळे संयमाने व शिस्तीने परंतु उत्साहात सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा. आप्तेष्ट मित्रांना ॲानलाइन श्रीगणेशाचे दर्शन द्यावे. तसेच त्यांना ॲानलाइन आरतीत सहभागी करून घ्यावे. 'कोरोनाचे संकट लवकर दूर होऊदे' अशी प्रार्थना विघ्नहर्त्याला करावी.

(लेखक- पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत)

loading image
go to top