Accident News: पुण्यातील चांदणी चौक परिसरात बस १५ फूट कोसळली खाली; ८ प्रवासी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: पुण्यातील चांदणी चौक परिसरात बस १५ फूट कोसळली खाली; ८ प्रवासी जखमी

मुंबईतून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून कोसळून अपघात झाला आहे. या आपघातामध्ये आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याची माहीती आहे. हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. ही बस शर्मा ट्रॅव्हल्सची होती. बावधन येथे मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्त्यावर जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस १५ ते २० फूट खाली कोसळली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बायपासवरून साधारण १५ फूट खाली कोसळली आणि पलटी झाली. अपघातग्रस्त बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. या बस अपघातात आठ प्रवासी जखमी झालेत. जखमींना तातडीने उपचारासाठी कोथरुड परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आलं.

अपघात झालेल्या परिसरातील रस्त्याच्या कडेला दिव्यांचा अभाव असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना वाढत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या परिसरात दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, या अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याहून बाजुला केलं. जवळपास अर्ध्या तासानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली आहे.

टॅग्स :accidentbus accident