पुण्यात झाड कोसळून रिक्षाचालक गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात झाड कोसळून रिक्षाचालक गंभीर जखमी

पुण्यात झाड कोसळून रिक्षाचालक गंभीर जखमी

पुणे : शहरात गुरूवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. शुक्रवारी सकाळपासून शहराच्या वेगवेगळ्या भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोठी झाडे कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून वाहतुक सुरळीत केली. तर दुपारी साडे तीन वाजता केईएम रुग्णालयाजवळ मोठे झाड रिक्षा पडल्याने रिक्षाची मोडतोड झाली तसेच रिक्षाचालक गंभीररित्या जखमी झाला.

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी कर्वेनगर भागातील नवसह्याद्री परिसर, विठ्ठल मंदिर तसेच एरंडवणे भागातील पटवर्धन बाग या भागामध्ये मोठी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. नागरीकांनी याबाबत अग्निशामक दलास खबर दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील झाडांच्या फांद्या कापून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिली.

हेही वाचा: भय इथले संपत नाही! मुळा-पवनाच्या पाण्यात वाढ

शहरात शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे नदीपात्रालगत असणाऱ्या झोपड्यांमध्ये पाणी शिरण्याची घटना अद्याप घडलेली नाही. तरीही गुरूवारी रात्रीपासून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून नदीपात्र परिसरात अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आले असल्याची माहिती अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान, रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयासमोर एक मोठे झाड कोसळले. तेथे थांबलेली रिक्षा झाडाखाली आल्याने रिक्षाची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत झाडाच्या फांद्या कापून रिक्षाचालकाचा जीव वाचविला. त्याचबरोबर झाड बाजूला काढून वाहतुक सुरळीत केली.

भिडे पूल वाहतुकीस बंद

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने शहराचा मध्यवर्ती भाग व कोथरुड, कर्वेनगर, वारजे, एरंडवणे या भागांना जोडणारा डेक्कन येथील भिडे पुल गुरूवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली आहे. त्यामुळे भिडे पुल बंद ठेवण्यात आला आहे. तसेच तेथे डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यांचे पोलिस कर्मचारीही बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले. याबरोबरच डेक्कन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक किरण बालवडकर व वाहतूक शाखेतील कर्मचारी वाहतुक सुरळीत करण्यावर भर दिला आहे.

टॅग्स :Pune News