esakal | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीबाबत घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा


Ajit Pawar meeting

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीबाबत घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : शहरातील जी रुग्णालय व डॉक्टर्स कोरोना काळात रेमडेसिविर इंजेक्शन्स, ऑक्सिजन बेडस, स्कॅनचे अहवाल व इतर काही बाबतीत चुकीच्या पध्दतीने कामकाज करत आहेत. त्यांची शासकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या (ता. 16) बैठकीत निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या बाबत माहिती दिली. कोरोना संदर्भात आज अजित पवार यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा: पुण्यात पीएमपी धावणार; कोणाकोणाला मिळणार प्रवेश, वाचा

रेमडेसिविर इंजेक्शनसह इतरही काही बाबतीत तक्रारी येत असून, उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे. या बाबत उपविभागीय अधिकारी तपासणी पथक नेमणार असून, प्रत्येक दवाखान्यांमध्ये जाऊन विविध बाबींची तपासणी हे पथक करेल. दरम्यान, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालयात आगप्रतिबंधक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना पवार यांनी प्रशासनास दिल्या. वैद्यकीय महाविद्यालय व शासनाच्या आरोग्य विभागाशी संबंधित काही डॉक्टर्स बारामतीत सेवा बजावत नसून दररोज पुण्याहून ये जा करतात ही बाबही निदर्शनास आणून दिल्यानंतर या बाबत कार्यवाहीच्या सूचना प्रशासनास दिल्या गेल्या. बारामतीतील रुग्णांना रेमडेसिविर, मनुष्यबळ, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी जिल्हाधिका-यांना या बैठकीत दिल्या. बारामती येथील शासनाच्या सर्वोपचार रुग्णालयात 150 खाटांच्या क्षमतेचा ऑक्सिजनची सुविधा असलेला विभाग येत्या आठवडाभरात सुरु करण्याचे आदेश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. पुढच्या 150 खाटांचा विभाग पुढच्या दहा दिवसांत कार्यान्वित करा असे पवार यांनी सांगितले. दरम्यान सुपे ग्रामीण रुग्णालय येथेही 25 खाटांचे रुग्णालय तयार करण्याच्या सूचना पवार यांनी आरोग्य विभागास दिल्या.

हेही वाचा: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात राज्य सरकार उचलणार वाटा; शासन निर्णय जाहीर

बिलांचीही होणार तपासणी-खाजगी दवाखान्यांकडून रुग्णाला दिल्या जाणा-या बिलांचीही तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी या बैठकीत दिले. बिलांबाबत शासननिर्देश व दिली जाणारी बिले यांची पडताळणी काटेकोरपणे करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई शासकीय रुग्णालय व नर्सिंग वसतिगृह यांची क्षमता 305 खाटांची आहे. तर 28 खाजगी रुग्णालयात 1000 रुग्णांची सोय होऊ शकते. बारामतीत आज जवळपास 200 खाटा रिकाम्या आहेत. दररोज 13 टक्के रुग्ण घरी जात असल्याने जास्त कोविड केअर सेंटरची गरज भासणार नाही, असे किरण गुजर म्हणाले.

बारामतीतील कोविड केअर सेंटर

•शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 212

•डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह- 100

•तारांगण महिला वसतिगृह- 100

•शिवनगर विद्या प्रसारक मंडळ- 300

•पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह- 91

•अनेकांत एज्युकेशन सोसायटी वसतिगृह- 158

•विद्या प्रतिष्ठान वसतिगृह- 128

•रयत भवन- 100