जुन्नर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या गावात तुतारीचा डंका

जुन्नर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या गावात तुतारीचा डंका

महायुतीतील नेत्यांच्या गावात तुतारीचा डंका

दत्ता म्हसकर : सकाळ वृत्तसेवा
जुन्नर, ता. ५ : शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या गावातही तुतारी आवाज घुमला; तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावातून डॉ. कोल्हे यांना निर्णायक आघाडी देत आपले गड कायम राखल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील राजकीय स्थित्यांतरानंतरही सलग दुसऱ्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा जुन्नर तालुका डॉ. कोल्हे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. त्याला महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर व शिवसेनेचे माउली खंडागळे यांची भक्कम साथ लाभली. प्रामुख्याने आदिवासी, अल्पसंख्याक व ओबीसी मतदाराने कोल्हे यांना कौल दिला आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या महायुतीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांची तालुक्यात मोठी फळी असूनही त्यांना मतदारांकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतली होती, असेच झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे.
जुन्नर तालुक्यात लोकसभेसाठी ५८.१६ टक्के मतदान झाले. गेल्यावेळी ६४.९१ टक्के झाले होते. गेल्यावेळच्या तुलनेत ६.७५ टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरला असतानाही महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना तालुक्यात ५१ हजारांचे भक्कम मताधिक्य मिळाले. जुन्नर तालुक्यातील १५६ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात डॉ. कोल्हे यांना एक लाख ८ हजार १९९; तर आढळराव पाटील यांना ५६ हजार ७२३ मते मिळाली. तालुक्यातील काही मतदान केंद्राचा अपवाद वगळता बहुतेक सर्व केंद्रावर डॉ. कोल्हे यांनी निर्णायक आघाडी घेतली. काही मतदान केंद्रावर आढळराव तीन अंकी मतदान मिळवू शकले नाहीत. आदिवासी भागातील ६५ गावांतून ९० टक्क्यांहून अधिक मतदान डॉ. कोल्हे यांच्या पारड्यात टाकले गेले.
जुन्नर शहरातील २५ मतदान केंद्रापैकी ८ केंद्रावर आढळराव; तर १७ केंद्रांवर डॉ. कोल्हे यांनी घेतलेल्या आघाडीने त्यांना जुन्नर शहरात १ हजार ८०० मताधिक्य मिळाले. नारायणगाव हे कोल्हे यांचे गाव असल्याने ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. डॉ. कोल्हे यांच्या कोल्हे मळ्यातील दोन्ही केंद्रावर ५६५ व २९५ मते मिळवून कोल्हे यांनी ५००हून अधिक मतांची आघाडी घेतली. नारायणगावमधून दीड हजारांहून अधिक मताधिक्य घेतले.

बेनकेंच्या गावातही आघाडी
महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग पवार यांच्या निमगाव सावा येथील सहा मतदान केंद्रावर कोल्हे यांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. तसेच, भाजप नेत्या आशा बुचके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या केवाडी, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे यांच्या आपटाळे, बाजार समितीचे सभापती संजय काळे यांचे अमरापूर व आमदार अतुल बेनके यांच्या हिवरे बुद्रुक गावातूनही कोल्हे यांनी मतांची आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीची साथ
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांच्या शिरोली बुद्रुक गावातील तिन्ही केंद्रावर कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. येथे आढळराव यांना ३७२; तर कोल्हे यांना १२७५ मते मिळाली. माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांच्या डिंगोरे- उदापूर जिल्हा परिषद मतदार संघात, तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांचे पिंपळवंडी, माउली खंडागळे यांच्या मांजरवाडी गावात याचबरोबर ओतूर, राजुरी, बेल्हे, उंब्रज, आळे, आणे, आळेफाटा, डिंगोरे या मोठ्या गावातून देखील कोल्हे यांना मताधिक्य मिळाले. खासदार कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी दुर्गम भागातील कोपरे व जांभूळशी गावातून आढळराव यांना ४२; तर कोल्हे यांना ५१३ मते मिळाली. या पाठबळावर कोल्हे दुसऱ्यांदा विजयी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com