उभं करताना क्षणोक्षणी बहरत गेलेलं नाटक 

‘आमने-सामने’ या नाटकातील एका प्रसंगात  मंगेश कदम व लीना भागवत.
‘आमने-सामने’ या नाटकातील एका प्रसंगात मंगेश कदम व लीना भागवत.

दीर्घकाळानंतर रंगभूमीवर लगबग सुरू झाली आहे. काही नाटकांचे प्रयोग नव्या जोमाने होत आहेत. या मंडळींनी सांगितलेल्या गोष्टी. 

‘आमने-सामने’ या नाटकात मात्र एक पाऊल पुढे जाऊन दोन पिढ्यांमधील समन्वय दाखवला आहे. मागच्या पिढीने काळाबरहुकूम नव्याचा स्वीकार करावा, हा पैलू यात धमाल करत मांडला आहे.

‘आमने-सामने’ या नाटकाची जन्मकथाच मुळी मजेशीर आहे. या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक नीरज शिरवईकर हा माझ्या वेगळ्याच नाटकाचा प्रयोग पाहायला आला होता. तो संपल्यावर चहा पिताना त्याने नव्या विषयाची संकल्पना मांडली. त्यावर मी बेहद्द खूष होऊन हातातलं मानधनाचं पाकीट तत्काळ त्याच्या हातात दिलं. मंगेश कदम आणि मी त्याला सांगितलं की, हे नाटक पुरं कर. आपण ते करायचं आहे. त्यानंतर तीन-साडेतीन महिन्यांनी माझ्या आणि मंगेशच्या लग्नाचा वाढदिवस होता. तो दिवस म्हणजे १६ एप्रिल. नीरजच्या घरी आम्ही गेलो होतो. त्याने आणि मंगेशने मला सरप्राइज म्हणून त्या नाटकाच्या पहिल्या ड्राफ्टचं वाचन ठरवलं होतं. तो अनुभव अविस्मरणीय होता. मला सगळे संवाद ऐकताना प्रचंड मजा वाटत होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ड्राफ्ट पक्का करायला ऑक्‍टोबर उजाडला. मग तालमी सुरू झाल्या. त्यातली धमाल तर विचारू नका. नाटकातील गोष्ट एका महिन्याभराच्या कालावधीत घडते. या दरम्यान १३-१४ वेळा वेश बदलणं वगैरे होतं. आमची वेशभूषाकार अमिता खोपकरने त्यात काही युक्ती योजिली. ती गंमत प्रत्यक्ष नाटकातच पाहायला हवी. सेटही मजेदार आहे. समोरासमोर दोन फ्लॅट्‌स व जवळच चक्क लिफ्टही दाखवली आहे. ती वर-खाली जात-येत असते. प्रदीप मुळ्ये यांच्या या कल्पक नेपथ्यरचनेमुळे नाटकाची रंगत भलतीच वाढली आहे. हे सगळं तालमीदरम्यानच त्या दोघांना सुचत गेलं. मंगेश आणि माझ्याबरोबर रोहन गुजर व मधुरा देशपांडे हे दोघे उमदे कलाकार आहेत. आम्हा चौघांची जी देवाणघेवाण यात चालते, तिच्यातील वाटा-आडवाटा आम्हाला तालमीत सापडत गेल्या. बरेच बदल आणि ‘हेही ठेवू, तेही ठेवू’ करता-करता रंगीत तालमीच्या वेळी हे नाटक आहे त्यापेक्षा बरंच मोठं झालं. मग नीरजने दिग्दर्शकीय अधिकार वापरून ते कापत-कापत आटोपशीर केलं. 

मराठी रंगभूमीवर यापूर्वी आलेल्या नाटकांचे ढोबळमानाने दोन प्रवाह दिसतात. पूर्वीच्या रूढी, प्रथा आजच्या काळातही जपायला हव्यात, हे सांगणारा एक प्रवाह. दुसऱ्यात प्रकारात आजची पिढी अगदी वेगळंच म्हणते आहे, ते सांगितलेलं होतं. बदल होतंच असतात, पण प्रत्येक बदलाचं नाटक नाही होऊ शकत. शिवाय यात एक महत्त्वाची बाब म्हणजे कलावंत प्रेक्षकांशी बोलत राहतात. कधी-कधी तर प्रेक्षकांकडून येणाऱ्या एखाद्या प्रतिसादावरून कलावंत चटकन वेगळा संवाद उत्स्फूर्तपणे म्हणतात. ‘आमने-सामने’ हे नाटक रंगमंचावर आलं आणि कोविडमुळे चार महिन्यांतच थांबणं भाग पडलं. आता पुन्हा आम्ही सज्ज झालो आहोत. कलावंत-प्रेक्षक यांच्यातील मोहक नातं नव्याने जगूया.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com