रोगानं नाही डॉक्टरनंच केला घात; कॅन्सरच्या नावाखाली उकळले दीड कोटी!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

डॉक्टरने फिर्यादीला 'आपण कॅनडाच्या एका आयुर्वेदीक संस्थेची फ्रॅंचायझी घेतली आहे, शहरातील अनेक रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे' असे सांगितले.

पुणे : महिलेला कॅन्सर झाल्याचे सांगत त्यावरील उपचारांसाठी महिला डॉक्‍टरने तब्बल दीड कोटी रुपये घेतले. त्यानंतरही महिलेकडे पैशांसाठी तगादा लावणाऱ्या डॉक्‍टरचा महिलेच्या पतीने खोटेपणा उघडकीस आणला. त्याचबरोबर डॉक्‍टर महिलेविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

डॉ. विद्या धनंजय गोद्रास (रा. वानवडी) असे गुन्हा ताखल झालेल्या महिला डॉक्‍टरचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव बुद्रुकमधील 58 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. डॉ. गोद्रास हिने फिर्यादीकडून आत्तापर्यंत एक कोटी 47 लाख रुपये इतकी रक्कम घेतली आहे. फिर्यादीचे पती संरक्षण खात्यात ऑडीटर म्हणून नोकरी करतात. फिर्यादीची एका मैत्रिणीच्या माध्यमातून डॉ. गोद्रास हिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी 2017 पासून डॉ. गोद्रास हिच्याकडे अर्धशिसी आणि गुडघेदुखीवर उपचार घेत होत्या. तर मागील वर्षी त्यांना अन्न नलिकेचा त्रास होत असल्याने त्यांनी डॉ. गोद्रास हिच्याशी संपर्क साधला.

ना पूर्ण पगार, ना नोकरीची हमी; अन् वरून राजीनामा देण्यासाठी दबाव!​

त्यावेळी तिने फिर्यादीला 'आपण कॅनडाच्या एका आयुर्वेदीक संस्थेची फ्रॅंचायझी घेतली आहे, शहरातील अनेक रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे' असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना व्हॉटस्‌अपवर नाभीचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले. ते छायाचित्र तिने कॅनडातील संस्थेकडे पाठविले. त्यानंतर संबंधीत संस्थेकडून आलेल्या अहवालामध्ये फिर्यादी यांना लिव्हर असायटीस झाल्याचे असल्याचे तिने सांगितले. संबंधीत अहवाल हा गोपनीय असल्याने तो रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबीयांना दाखवत येत नसल्याचे सांगून तिने फिर्यादीवर उपचार सुरू करण्याचे सुचविले. त्याचबरोबर लवकर उपचार सुरु न केल्यास मृत्यू ओढावू शकतो, अशी भितीही दाखविली. या प्रकारामुळे घाबरून फिर्यादी यांनी डॉ. गोद्रासकडे तत्काळ पैसे भरून उपचार सुरू केले. त्यानंतरही संबंधीत डॉक्‍टर फिर्यादी यांना अहवाल किंवा औषधांची चिठ्ठी न देता त्यांना केवळ गोळ्या देत होती. 

बायकोवरील बलात्काराचा खोटा कावा करत उकळले 20 लाख; आणखी 2 लाखांच्या नादात सापडला जाळ्यात​

दरम्यान, यावर्षी पुन्हा फिर्यादीच्या नाभीचे छायाचित्र संबंधीत संस्थेला पाठवून फिर्यादीस लिव्हरच्या वरच्या बाजूस कॅन्सरची गाठ असल्याचे सांगितले. त्यावरील उपचारांसाठी सात लाख रुपये आगाऊ मागितले. मात्र फिर्यादीकडील पैसे संपले होते. त्यांनी त्यांच्या पतीकडे पैशांची मागणी केली. पतीने विचारल्यानंतर फिर्यादीने त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबतची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादीच्या पतीने आजाराची कागदपत्रे आणि अहवाल मागितले. त्यावेळी डॉ. गोद्रास हिने ते देण्यास नकार दिला. या प्रकारामुळे संशय वाटल्याने एका वकीलाला घेऊन डॉ. गोद्रास हिची भेट घेतली. त्यावेळीही तिने आजार बरा झाल्याशिवाय अहवाल देता येत नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: female doctor defrauded patient of Rs 1 crore 50 lakh for fake cancer