दोन लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध 'एसीबी'ची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

acb

जागेसंबंधीच्या वादामध्ये सहकार्य करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या कोंढवा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) कारवाई केली.

Crime Bribe : दोन लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध 'एसीबी'ची कारवाई

पुणे - जागेसंबंधीच्या वादामध्ये सहकार्य करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या कोंढवा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) कारवाई केली आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांमध्ये कोंढवा पोलिस ठाण्यात "एसीबी'ची झालेली हि दुसरी कारवाई आहे.

स्वराज पाटील असे लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. पाटील कोंढवा पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. 38 वर्षीय तक्रारदाराच्या पत्नी व सासऱ्यांविरुद्ध जागेच्या वादासंबंधी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली होती. संबंधित तक्रार अर्जावरुन कारवाई न करता, तक्रारदारास योग्य ते सहकार्य करण्यासाठी स्वराज पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती.

याप्रकरणी तक्रारदारांनी "एसीबी'कडे तत्काळ तक्रार अर्ज दाखल केला. दरम्यान, "एसीबी'च्या पथकाने जुन महिन्यात पडताळणी केली. त्यामध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पाटील यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील महिन्यातच कोंढवा पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस उपनिरीक्षकास लाच घेतल्याच्या कारणावरुन "एसीबी'च्या पथकाने कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता दुसऱ्यांदा कोंढवा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यावरच लाचप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.