पत्नीचा अपघाती मृत्यू; पतीला नुकसानभरपाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याने शेतकरी विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळावी, यासाठी दाखल केलेल्या दाव्यात शेतकरी पतीला ग्राहक मंचाने दिलासा दिला आहे. तक्रारदार शेतकऱ्याला सात टक्के व्याजदराने दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने विमा कंपनीला दिला. 

पुणे - अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याने शेतकरी विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळावी, यासाठी दाखल केलेल्या दाव्यात शेतकरी पतीला ग्राहक मंचाने दिलासा दिला आहे. तक्रारदार शेतकऱ्याला सात टक्के व्याजदराने दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने विमा कंपनीला दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, सदस्या शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर प्रभाकर वाघमारे (रा. चांदोली, ता. खेड) यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., खेड तालुका कृषी अधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. 

20 सप्टेंबर 2016 रोजी ही घटना घडली. तक्रारादार वाघमारे यांची पत्नी संगीता या शेतकरी होत्या. त्या बसने प्रवास करत असताना कंटेनरने बसला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. वाघमारे यांनी तलाठ्याकडे कागदपत्रांसह विम्याचा दावा दाखल केला. मात्र, विमा कंपनीने अद्याप तक्रारदारांचा दावा मंजूर केला नाही. 

मृत व्यक्ती शेतकरी असणे, ही विम्याची रक्कम मिळण्यासाठी प्रमुख अट आहे. संगीता या शेतकरी असल्याचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी कंपनीला दिला नाही. त्यामुळे त्या विमा मिळण्यास पात्र ठरत नाही, असे कंपनीचे म्हणणे होते. मात्र, योजनेअंतर्गत अपघाताच्या पुराव्यासाठी दाखल करावयाच्या कागदपत्रांमध्ये मृत किंवा अपघातग्रस्त शेतकऱ्याचा सातबारा उतारा दाखल करावा, अशी अट असल्याचा शासन निर्णय आहे. संगीता यांचा सातबारा उतारा तक्रारदाराने दाखल केला होता. त्यामुळे संबंधित कागदपत्रे दाखल केली नाहीत, या कारणामुळे दावा नाकारणे योग्य होणार नाही, असे मंचाने निकालात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of wife Compensation for husband