बनावट कागदपत्रांव्दारे 24 लाखांची फसवणूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात

निलेश बोरुडे
Friday, 27 November 2020

एका दिवसाची पोलिस कोठडी; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर.

किरकटवाडी : कर्जासाठी तारण म्हणून भूखंडाची बनावट कागदपत्रे व बनावट पॅनकार्ड सादर करून नांदेड सिटी येथील टि. एम. बी. बँकेला तब्बल चोवीस लाखांचा गंडा घालून सुमारे तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला हवेली पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समीर संजय मोहिते (रा.506, मोहिते वाडा, हत्ती गणपती जवळ, सदाशिव पेठ, पुणे.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नांदेड (ता. हवेली) येथील टी.एम.बी बँकेच्या शाखेतून 24 लाखांचे कर्ज घेऊन  आरोपी समीर मोहिते हा फरार झाला होता. विशेष म्हणजे  कर्जासाठी सादर केलेली कागदपत्रे पूर्णपणे बनावट होती. सदर बाब बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर 2017 साली हवेली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती‌.

बँकेची फसवणूक करून फरार असलेला आरोपी नांदेड फाटा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनवे, राजेंद्र मुंढे, दिपक गायकवाड, चालक महेंद्र चौधरी व होमगार्ड सुशील गाभणे यांच्या पथकाने सापळा रचून समीर मोहिते यास अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीस कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर पुढील तपासासाठी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे इतर बँकांचीही फसवणूक- टि. एम. बी. बँकेला तारण म्हणून जांभूळवाडी येथील भूखंडाची जी बनावट कागदपत्रे सादर केलेली आहेत त्याच बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपी समीर मोहिते याने पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पेरुगेट शाखा व यंत्र निर्माण पतसंस्था यांच्याकडून 31 लाखांचे कर्ज मिळविले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे आणखीही इतर बँकांना आरोपी समीर मोहिते याने फसविले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी  

बनावट दस्त कोठे व कसे बनविले? समीर मोहिते याने जांभूळवाडी येथील एका भूखंडाचे बनावट दस्त तयार करून बँकांची फसवणूक केली आहे. मात्र भूखंडाची बनावट कागदपत्रे कोठून व कसे तयार केली ही बाब अजून उघड झालेली नाही. आरोपी समीर मोहिते यास बनावट दस्त तयार करून देणाऱ्यांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused arrested for defrauding Rs 24 lakh through forged documents