esakal | ऑनलाईन गेमिंग कनेक्शनमधून मागितली 30 लाखाची खंडणी; पोलिसांनी उधळला डाव
sakal

बोलून बातमी शोधा

 Accused arrested Kidnapping boy demanding ransom of Rs 30 lakh

तरुणाचे अपहरण करून 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी, 3 लाख रुपये स्विकारताना आरोपींना अटक 

ऑनलाईन गेमींगच्या प्रकारातून घडली घटना, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना ठोकल्या बेड्या 

ऑनलाईन गेमिंग कनेक्शनमधून मागितली 30 लाखाची खंडणी; पोलिसांनी उधळला डाव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : तरुणाच्या मोबाईल ऍपद्वारे विविध प्रकारच्या ऑनलाईन खेळांसाठी बेटींग करून तरुणाकडे तब्बल तीस लाख रुपयांची मागणी केली. तेवढ्यावरच न थांबता तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. अमोल रमाकांत एकबोटे (वय 21, रा. बाणेर), सौरभ पांडुरंग माने (वय 25, रा. बाणेर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय तरुणाने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे. अमोल एकबोटे हा संगणक अभियंता असून माने हा एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. मित्रांच्या पार्टीमध्ये फिर्यादीची आरोपींशी ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीस ते एका मोबाईल ऍपवरील ऑनलाईन गेमींग प्रकारामध्ये खेळल्यास भरपरू पैसे मिळतील असे आमिष दाखविले होते. त्यानंतर अमोल एकबोटे याने फिर्यादीच्या मोबाईल ऍपचे लॉगईन आयडी व पासवर्ड घेऊन आरोपींनी ऑनलाईन क्रिकेट, फुटबॉल, टेनिस अशा खेळांच्या प्रकारावर बेटींग खेळण्यास सुरूवात केली. त्यामध्ये एकबोटे याने बेटींग गेम खेळून फिर्यादीच्या नावावर 30 हजार पॉईंटस्‌ जमा झाल्याचे सांगितले. त्याच्या मोबदल्यात, त्याने फिर्यादीकडे 30 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांना नकार दिला. त्यामुळे अमोल एकबोटे, सौरभ माने, आदित्य वर्मा, ओंकार लांडगे व दया लांडगे यांनी फिर्यादीच्या कारमधून अपहरण केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादीस खेड शिवापुर येथील जगदंबा हॉटेलमध्ये नेऊन शिवीगाळ केली. त्यानंतर एकबोटेने फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत त्यामधील व्हॉटस्‌अपवरुन फिर्यादीच्या पॅनकार्डचे फोटो व दर आठवड्याला 3 ते 4 लाख रुपये देणे आहे, असा मेसेज तयार करून तो स्वतःच्या मोबाईलवरील व्हॉटस्‌अपवर पाठवून दिला. त्यानंतर फिर्यादीला कात्रज येथे सोडून दिले.

पुण्यात ऑक्सिजन न मिळण्याच्या तक्रारी, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 टोल फ्री नंबर जाहीर

दरम्यान, 5 एप्रिलला आरोपींनी फिर्यादीकडे 30 लाख रुपयांपैकी तीन लाख रुपयांचा पहिला हफ्ता देण्याची मागणी केली. या सगळ्या घडामोडीनंतर खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दाखल झाली. त्यानंतर वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी तीन लाख रुपये घेण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

loading image