अबब, या पतसंस्थेत 30 कोटींचा अपहार, आरोपींना पुन्हा कोठडी   

सिद्धार्थ कसबे
Saturday, 5 September 2020

श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेत संचालक मंडळ, व्यवस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी संगनमताने मार्च २०१७ पर्यंत ३० कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांचा अपहार केला आहे.

पिंपळवंडी (पुणे) : उंब्रज (ता. जुन्नर) येथील श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी सरव्यवस्थापक सत्यवान बेलोटे व माजी उपाध्यक्ष रामचंद्र हांडे यांना खेड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेत संचालक मंडळ, व्यवस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी संगनमताने मार्च २०१७ पर्यंत ३० कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांचा अपहार केला आहे. यातील मुख्य आरोपी माजी अध्यक्ष हनुमान हांडे यांच्यासह ३३ जणांवर ओतूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक परशूराम कांबळे यांनी दिली. 

अबब! पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना ठोठावला तब्बल सव्वा कोटींचा दंड​

या प्रकरणातील सरव्यवस्थापक सत्यवान बेलोटे यांना सोमवारी (ता. ३१) देवीभोयरे (ता. पारनेर, जि. नगर) येथून आणि माजी उपाध्यक्ष रामचंद्र हांडे यांना मंगळवारी (ता. १) नारायणगाव (ता. जुन्नर) येथून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या दोघांना खेड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. ती शनिवारी संपली असून, या आरोपींना खेड न्यायालयात शनिवारी (ता. ५) पुन्हा हजर केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांना येरवडा कारागृहात पाठविले आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली.

दरम्यान, सहकारातील पूर्वानुभव असणाऱ्या या पतसंस्थेच्या सदस्यांनी समन्वय समिती स्थापन करून ठेविदारांची रक्कम पुन्हा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या गैरव्यवहारामुळे ठेविदारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर हांडे व शेतकरी संघटनेचे संघटक अंबादास हांडे यांनी दिली. या समितीने सहकार आयुक्त, उपयुक्त महाराष्ट्र राज्य यांना या संबंधीची माहिती दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused in Junnar taluka embezzlement case remanded in custody