
गुंड गजा मारणेला ग्रामीण पोलिसांनी यापुर्वीच केली अटक, तर पुणे पोलिसांकडून गुंड शरद मोहोळला दोन महिन्यांसाठी पुण्यात प्रवेश निषिद्ध
पुणे : ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्यानंतर पुणे पोलिसांनीही आक्रमक भुमिका घेत गुंड निलेश घायवळ यास मंगळवारी सकाळी अटक केली. घायवळविरुद्ध पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत.
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर गुंड गजा मारणे याने काही दिवसांपुर्वी तळोजा कारागृहातुन बाहेर पडताच स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी मुंबई ते पुणे अलिशान वाहनांच्या ताफ्यासह पुण्यात प्रवेश केला. मारणेच्या या "एन्ट्री'वर सडकून टिका झाल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुणे पोलिसांचे कान टोचल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करीत त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. अखेर ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने त्यास बेड्या ठोकल्या. दुसरीकडे गुंड शरद मोहोळला दोन महिने शहरात वास्तव्य करण्यास व प्रवेश निषिद्ध करण्याचे अस्त्र पुणे पोलिसांनी उगारले. त्याचवेळी ग्रामीण पोलिसांनी गुंड निलेश घायवळ यालाही ताब्यात घेत त्यास स्थानबद्ध केले होते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, निलेश घायवळचा हस्तक संतोष धुमाळ, अक्षय गोगावले, विपुल माझिरे, कुणाल कंधारे, मुसाब शेख व अन्य तिघांनी कोथरुड येथील एका गॅरेज चालकाकडे जाऊन "भाऊच्या रॅलीसाठी गाडी पाहीजे' असे सांगत, चॉपरचा धाक दाखवित त्याची महेंद्रा कंपनीची तीन लाख रुपये किंमतीची जीप जबरदस्तीने नेली. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल होता. संबंधीत गुन्ह्यात निलेश घायवळ व त्याचे साथीदार असल्याचे पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले होते. या गुन्ह्याची दखल घेत पुणे पोलिसांनी घायवळ टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली होती.दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने निलेश घायवळ यास अटक केली. घायवळ विरुद्ध पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात खुन - 2, खुनाचा प्रयत्न -3, दरोडा - 2, गंभीर दुखापत - एक, खंडणी - दोन, अपहरण -एक असे एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. घायवळ व त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली.