घोडेगाव ठाण्यात आरोपीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

घोडेगाव - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सुलदास उंबऱ्या काळे ऊर्फ कुक्‍या काळे (वय 25, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. संध्याकाळी साडेसातला एवढी मोठी घटना घडूनही प्रसार माध्यमांना माहिती दिली गेली नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

मंचर पोलिसांनी सुलदास उंबऱ्या काळे ऊर्फ कुक्‍या काळे याला बुधवारी (ता. 13) जून नगर पोलिसांकडून लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील दरोड्यासंदर्भात कबुली दिल्याने ताब्यात घेतले होते. गुरुवार (ता. 14) रोजी घोडेगावात न्यायालयात चार दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. आरोपी सुलदास उंबऱ्या काळे ऊर्फ कुक्‍या काळे याने ब्लॅंकेटची रस्सी बनवून टॉयलेटच्या खिडकीला गळफास घेतला. मंचर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कांबळे हे घोडेगाव सबजेल येथे गार्ड ड्यूटी म्हणून नेमणुकीला होते. त्यांची ड्यूटी चालू असताना त्यांना त्यांच्या कोठडीतील आरोपी दिसला नाही. त्यामुळे त्यांनी कोठडीतील शौचालयाकडे पाहिले असता शौचालयाचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. सहाय्यक फौजदार राजेंद्र कांबळे यांनी आरोपीस हाका मारल्या असता आतून प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी ड्यूटीवर असलेल्या सहकाऱ्याला बोलावून शौचालयाचा दरवाजा उघडून पाहिले असता आरोपी काळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

आत्महत्येसंदर्भात घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांना सदर माहिती देऊन वरिष्ठांना माहिती कळवली. पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय घोडेगाव या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करिता आणले असता डॉक्‍टरांनी सदर आरोपीस तपासून मयत झाल्याचे जाहीर केले. अंतिम पंचनामा हा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शवविच्छेदन करतेवेळी चित्रीकरण होणार आहे. घोडेगाव पोलिस ठाणे येथे आकस्मात मयत मृत्यूची नोंद झालेली आहे. पुढील तपास घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सदर बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला कळवण्यात आलेली आहे. घटनास्थळी पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलिस उपविभागीय अधिकारी राम पठारे, दयानंद गावडे यांनी भेट दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused suicide in ghodegaon police station