जिगसॉ पझ्झल्सचे प्रदर्शन चिकाटी आणि संयमाचे उदाहरण : अच्युत गोडबोले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

या प्रदर्शनातील जिगसॉचा प्रत्येक बिंदू सुंदररितीने मांडला आहे. कल्पनेपलीकडच्या जिगसॉ फ्रेम्स येथे मांडल्या असून कलात्मकदृष्ट्या हे प्रदर्शन खूप बहुमोल आहे. माणसाचे आयुष्य देखील अशा जिगसॉ पझल्ससारखेच असते.

पुणे : भलेमोठेचित्र वाटावे अशी प्रत्येक तुकड्याच्या जोडणीतली अचूकता दाखविणारे आणि अचंबित करणारे जिगसॉ पझ्झल्सचे प्रदर्शन म्हणजे चिकाटी आणि संयमाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी आज व्यक्त केले. 

मोठमोठी, जटिल जिगसॉ कोडी सोडविण्याचा आगळावेगळा छंद असलेल्या आणि याच छंदामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड २०१९ चा मानकरी ठरलेला तरुण सिद्धार्थ जोशी याने जोडलेल्या शंभरहून अधिक मोठ्याआकाऱ्यांच्या जिगसॉ पझ्झल्सचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज गोडबोले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायाटी ऑफ रेअर आयटमसचे अध्यक्ष प्रदीप सोहोनी, नितीन मेहता, बस्ती सोळंकी, सिद्धार्थ जोशी, भूषण जोशी आणि स्मिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. २१ जानेवारी पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. सिद्धार्थने आत्तापर्यंत २०० हून अधिक विविध आकारांचे  आणि गुंतागुंतीचे म्हणजे अगदी ३००० तुकडयांपर्यंतचे जिगसॉ पझ्झल्स जोडले असून सिद्धार्थचे हे प्रदर्शन सर्वात मोठे आणि सर्वात जास्त संग्रह असलेले आहे. 

यावेळी बोलताना अच्युत गोडबोले म्हणाले की, या प्रदर्शनातील जिगसॉचा प्रत्येक बिंदू सुंदररितीने मांडला आहे. कल्पनेपलीकडच्या जिगसॉ फ्रेम्स येथे मांडल्या असून कलात्मकदृष्ट्या हे प्रदर्शन खूप बहुमोल आहे. माणसाचे आयुष्य देखील अशा जिगसॉ पझल्ससारखेच असते. आयुष्याचा आनंद आणि समाधान मिळविण्यासाठी आपल्याला देखील चिकाटी आणि संयम दोन्हीचा योग्य असा तोल सांभाळवा लागतो. सिद्धार्थच्या बाबतीत त्याच्या या छंंदाची सुरुवात केवळ एक थेरपी म्हणून झाली तरीही त्याने आणि त्याच्या पालकांनी हा छंद जोपासण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न निव्वळ थक्क करणारे आहेत. अतिश आगळ्यावेगळ्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या प्रदर्शनाला कुटुंबातील सर्व वयोगटातील व्यक्तींनी एकत्रितपणे भेट द्यायला हवी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण जोशी यांनी केले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Achyut Godbole visit puzzles exhibition in Pune