esakal | पुण्यातील 900 हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील 900 हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

पुण्यातील 900 हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुलींवरील अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्‍वभुमीवर शहर वाहतुक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. परवाना, परमीट बॅज नसणे, 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या रिक्षांचा वापर करणे, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 900 हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना ताजी असतानाच सहा वर्षांच्या मुलीवरही बलात्काराच्या घडलेल्या घटनांनंतर शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. एका घटनेमध्ये अन्य आरोपींसमवेत रिक्षाचालकाचा सहभाग होता, तर दुसरी घटना रिक्षाचालकानेच केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या पार्श्‍वभुमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे व प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, बेकायदेशीर रिक्षांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, गुरूवारपासून या कारवाईला सुरुवात झाली.

हेही वाचा: Video : जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींनी दिला 'जय माता दी'चा नारा

रिक्षा चालविताना गणवेश न वापरणे, बॅज न लावणे, वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या 740 रिक्षाचालकांवर शहर वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याबरोबरच प्रादेशिक परिवहन विभागाकडून 177 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये परवाना व परमीट नसणे, 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या रिक्षांचा वापर करणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली. शहरातील पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट बस, रेल्वे व एसटी स्थानकांबरोबरच विविध गर्दीच्या ठिकाणी, प्रमुख चौक व मुख्य रस्त्यांवर आणि उपनगरांमध्ये हि कारवाई करण्यात आली.

" वाहतुक पोलिस व आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वाहतुक पोलिसांनी 740 तर आरटीओने 177 रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे.''

-राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा.

loading image
go to top