esakal | कोथरुडमध्ये नियम डावलून शोरुम चालू ठेवणाऱ्यांवर कारवाई

बोलून बातमी शोधा

कोथरुडमध्ये नियम डावलून शोरुम चालू ठेवणाऱ्यांवर कारवाई

कोथरुडमध्ये नियम डावलून शोरुम चालू ठेवणाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरुड : कोरोना महामारीमुळे सरकारने लावलेल्या निर्बंधाला न जुमानता कोथरुड डेपोजवळ असलेल्या माय विंग होंडा शोरुम सुरु ठेवल्याबद्दल महानगरपालिका व पोलिसांनी कारवाई केली. यासंदर्भात भाजपा युवा मोर्चाचे कोथरुड विभाग अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, कोथरुड व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनिल गेहलोत, बाळासाहेब विचारे, केतन अडीया, रणजित फडके आदींनी तक्रार केली होती.

महानगरपालिकेच्यावतीने विना परवाना आस्थापना सुरु ठेवली म्हणून आरोग्य निरिक्षक वैभव घटकांबळे यांनी दहा हजार व मास्क न वापरल्याबद्दल पंधरा हजार असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारला. कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मेघश्याम डांगे यांनी कंपनी व शोरुममध्ये उपस्थित कर्मचाऱ्रयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांना आदेश दिले.

हेही वाचा: Pune Corona Update : शहरात नवे ५,३७३ रुग्ण; ५४,६२४ रुग्णांवर उपचार सुरु

दुष्यंत मोहोळ म्हणाले की, ''माय विंगच्या शाखेमध्ये पन्नास पेक्षा जास्त कर्मचारी काम करताना आढळले. त्यामध्ये अनेकांचे लसीकरण झालेले नव्हते. मास्क न लावता व योग्य अंतर न राखता तेथे काम सुरु असल्याचे आढळले. सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व कोथरुडकर सहकार्य करत असताना माय वींग शोरुम मात्र उघडे आहे. यांना वेगळी सवलत दिली आहे का हे स्पष्ट करावे अथवा नियम न पाळल्याबद्दल कडक कारवाई करावी'' अशी आमची मागणी आहे.

सुनिल गेहलोत म्हणाले की, ''कोरोना महामारी घालवण्यासाठी सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कोथरुडमधील सर्व व्यापारी बांधव तोटा सहन करुन नियमांचे पालन करत आहेत. मात्र जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. असे असेल तर आम्ही सुध्दा आमची दुकाने चालू करणार.''

हेही वाचा: नोंदणीची सक्षम यंत्रणा नसल्याचा बांधकाम मजुरांना फटका

माय विंगचे व्यवस्थापक प्रमोद ठोंबरे म्हणाले की, ''१५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, महानगरपालिका, कोथरुड पोलिस ठाणे येथे अती तातडीची सेवा पुरवणे बाबत परवानगी मागणारा अर्ज केला होता. त्यानुसार आम्ही कामगारांना बोलावले होते.''