पोलिसांची गाडी आली की मास्क येतोय नाकावर

pirangut.jpg
pirangut.jpg

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरात पोलिसांची गाडी आली रे आली की नाकाखाली गेलेला मास्क एका सेकंदात नाकावर जातोय...काही विनामास्क सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्कत फिरणारे बेफिकीर व अतिउत्साही हिरो मंडळी आणि दुचाकीस्वार पर्यटकांनी पोलिसांचा धसका घेतला असून ,सामान्य मुळशीकरांनी पोलिसांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पौड पोलिसांनी मुळशी तालुक्यात गेले तीन दिवस विविध प्रकारच्या कारवायांचा धडाका लावला आहे. त्यामुळे पर्यटकांना तर मोठा दणका दिला असून अवैध दारू विक्रेते आणि विनामास्क फिरणाऱ्या टुकारांवरही वचक बसायला लागला आहे. पर्यनास बंदी असतानाही काही अतिउत्साही 'बुलेट रायडर' मुळशीत येत असतात. पुणे ते लवासा गेटपर्यंत त्यांचा वावर असतो. त्यामुळे प्रवाशांना तसेच स्थानिक नागरिकांनाही त्यांचा उपद्रव होतो. काही महिन्यांपूर्वी भूगाव येथे ज्येष्ठ नागरिकाचा या रायडरमुळे अपघात झाल्याने मृत्यू झाला होता. काल या सगळ्यांना उरवडे व मुठा खिंडीत गाठून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. पुन्हा मुळशीत न फिरकण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, एका आलिशान इनोव्हा गाडीमध्ये गावठी दारू विकताना भूगाव येथील अमित प्रकाश सणस याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्या गाडीतील अडीच हजार रुपयांची दारू आणि ६ लाख ५२ हजार रुपये किंमतीची इनोव्हा गाडी जप्त केली आहे. याशिवाय गेल्या दोन दिवसांत ३६६ लोकांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून ७५६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी बेफिकीरपणे विनामास्क फिरणाऱ्या हिरो मंडळींना पोलिसी प्रसादही दिला आहे. त्यामुळे पिरंगुट परिसरात पोलिसांची गाडी आली की नाकाखाली गेलेला मास्क सेकंदात नाकावर जातो. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पोलिसांच्या या कारवाईबद्दल सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

याबाबत वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले की, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. पोलिसांच्या कारवाईची वेळ येऊ दिली नाही पाहिजे. तालुक्यात पर्यटनास बंदी असतानाही काही रायडर लवासा परिसरात फिरतात. त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत. उपनिरीक्षक अनिल लवटे म्हणाले की, काही तरुण मंडळींना अद्याप कोरोना या महामारीचे गांभीर्य अद्याप 
कळालेले दिसत नाही. त्यामुळे विनामास्क फिरणे. कोणतेही कारण नसताना एकत्र येऊन गप्पा मारणे, या बाबी त्यांनी टाळल्या पाहिजेत. या बेफिकीर तरुण मंडळीच्या कुटुंबातील लहान मुलांना व वयोवृद्ध माणसांना त्याचा फटका बसू नये, हीच अपेक्षा कारवाईमागे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com