पुणे जिल्ह्यात मास्क न लावता फिरणाऱ्यांना असा बसलाय दणका...

corona1
corona1

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले उचलली आहे. त्यात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

मंचर : “मंचर शहरात कोरोना विषाणूचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे मंचर ग्रामपंचायत व पोलीस खात्याने  तोंडावर मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.आज एकूण ६३ जणांवर प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये काही दुकानदार , रस्त्याने पायी प्रवास करणारे व दुचाकी चालकांचा समावेश आहे.आतापर्यंत एकूण १०४ जणांकडून ५२ हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.

  मास्क न वापरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीने तीन भरारी पथके कार्यरत केली आहेत.ग्रामपंचायतीचे कर्मचारी संदीप लोंढे,अतुल लोंढे,दिलीप थोरात,रमेश डिंगोरकर ,पोलीस नाईक गणेश डावखर यांचा पथकात समावेश आहे.त्याचा चांगला परिणाम झाला आहे. या पथकाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.दंडाच्या भितीपोटी मास्क वापरण्या विषयी  नागरिक काळजी घेत आहेत.

दरम्यान शहरातील दुकानदारांनी उद्यापासून  पुढील काही दिवसांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत आपली दुकाने उघडी ठेवावीत. या निर्णयाची कुणावरही सक्ती केली जाणार नाही. ज्यांना हा निर्णय मान्य नसेल, त्यांनी आपली दुकाने यावेळी व्यतिरिक्तही  उघडी ठेवावीत. व्यवसाय करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्रुटी आढळल्यास किवा नियम पाळत नसल्यास दुकानदारावर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दत्ता गांजाळे यांनी दिला .

बारामती : प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनही मास्कचा वापर न केल्याबद्दल आज सलग दुस-या दिवशी बारामती नगरपालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 98 नागरिकांवर प्रत्येकी दोनशे रुपये दंडात्मक कारवाई केली. 

बारामतीतील भिगवण रस्ता, सिटी इन चौक, पेन्सिल चौक या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप, आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे, पोलिस कर्मचारी भाऊसाहेब पलंगे, दत्ता सोननीस ,दादा ओमासे, भुलेश्वर मरळे, प्रशांत राऊत,  अमोल नरुटे,  रणजीत मुळीक, नगर परिषद कर्मचारी संजय गडीयल, विनोद सिसवाल,  निखिल शिलवंत, सतिश धाईंजे आदींनी मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाईच्या मोहिमेत सहभाग नोंदविला. 

कालही नगरपालिकेने धडक मोहिम राबवत 53 नागरिकांवर प्रत्येकी दोनशे रुपये दंडात्मक कारवाई केली होती. लॉकडाउन शिथील झाल्यानंतर कोरोनाची कसलीही भीती मनात न ठेवता असंख्य बारामतीकर बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संसर्गाचा धोका वाढतो आहे. बारामतीत आता संध्याकाळी सातपर्यंत व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. जरी रुग्ण सापडत नसले, तरी कमालीची काळजी घेण्याची गरज असून, नागरिकांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

वेल्हे : वेल्हे येथील नऊ जणांवर मास्क न घातल्याने कारवाई करण्यात आली. 500 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करून एकूण 4500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वेल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन ढुके व हवालदार औदुंबर आडवाल, उपसरपंच विकास गायखे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

खळद : शिवरी( ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत व कोरोना दक्षता कमिटी यांनी गावामध्ये प्रवेश करताना मास्क न लावणा-यांवर कारवाईचा बडगा उचलला असून अवघ्या एका तासात आठ  जणांकडून चार हजार रुपये दंड वसूल केला.

      येथील नागरिकांनी आपले गाव कोरोना मुक्त ठेवण्यामध्ये यश मिळवले. कोरोना दक्षता कमिटीने आजपासून गावात नाकाबंदी करत कोणीही विनामास्क प्रवेश करू नये यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ही कारवाई झाली‌. यामध्ये काही गावच्या प्रतिष्ठित नागरिकांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला. त्यांच्या या कारवाईचे सर्व स्वागत करीत आहेत. मात्र एका माजी सरपंचांच्या विरोधामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला व  दक्षता कमिटी सदस्य नाराज होऊन त्यांनी काम थांबविले होते, यावेळी ग्रामसेविका ताई गायकवाड यांनी याबाबत आपण वरीष्ठ कार्यालयात अर्ज देऊ, असे सांगत काम सुरू करण्याची विनंती केली.

यावेळी पोलीस पाटील नवनाथ लिंभोरे, तुकाराम कांबळे, नवनाथ गायकवाड, दत्ता लिंबोरे, विकास कामथे, योगेश कामथे, समीर कामथे, राजाभाऊ क्षीरसागर उपस्थित होते.

कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, सणसवाडीसह पाबळ येथील 130 लोकांवर मास्क न वापल्याबद्दल प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे एकूण 65 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. 

पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, हवालदार संजय ढावरे तसेच सणसवाडीचे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, पोलिस पाटील दत्तात्रय माने, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर दरेकर आदींनी सणसवाडी व परिसरात तोंडावर मास्क न लावणाऱ्या, रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर पाचशे रुपये दंड आकारत कारवाई करण्यास सुरवात केली. विनामास्क फिरणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाईसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. त्यांना पोलिसांचे पाठबळ देऊ, असे शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com