Pune News : अनधिकृत होर्डिंग्ज व दुकानांवरील कारवाईनंतर राडारोडा कोण उचलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

action against unauthorized hoardings and shops pune

Pune News : अनधिकृत होर्डिंग्ज व दुकानांवरील कारवाईनंतर राडारोडा कोण उचलणार

उंड्री - उंड्री-हडपसर रस्त्यावरील अतुरनगर, इरो स्कूल, कडनगर चौकातील उंड्री-महंमदवाडी शिवेवर अनधिकृत होर्डिंग्ज आणि दुकानांवर कारवाई केली. या रस्त्यावर अवजड वाहनांसह स्कूलबस आणि पाण्याच्या टँकरची मोठी वर्दळ असते. मात्र, राडारोडा उचलला गेला नसल्याने या रस्त्यावर अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने तातडीने राडारोडा उचलावा, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.महापालिकेच्या मुख्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही फक्त कारवाई करतो, राडारोडा उचलण्याचे काम संबंधित विभागाचे आहे. बांधकाम विभाग आणि आकाशचिन्ह विभागाकडे तक्रार केली, तर ज्यांनी कारवाई केले, त्यांचे काम आहे.

राडारोडा उचलण्याची आमची जबाबदारी नाही, असे म्हणून जबाबदारी झटकली जात आहे. पालिका प्रशासनाकडून अधिकृत होर्डिंग्ज आणि दुकानांवर फक्त कारवाई करण्याचे अधिकार आहेत का, राडारोडा उचलण्याची जबाबदारी त्यांची नाही का, असा संतप्त सवाल उंड्रीकरांनी उपस्थित केला. पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही राडारोडा उचलला जात नाही, त्यामुळे आम्ही स्वखर्चाने उचलून स्वच्छ करणार असल्याचे राजेंद्र होले, चंद्रकांत शिंदे, शशिकांत पुणेकर, राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले. अतुरनगर सोसायटीजवळील अनधिकृत होर्डिंग्ज आणि रस्त्यालगतची दुकानांवर कारवाई केल्यानंतर राडारोडा उचलावा यासाठी कोंढवा-येवलेवाडी आणि महापालिकेच्या मुख्य खात्याकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्याप राडारोडा उचलला गेला नाही, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

डॉ. अश्विन खिलारे, उंड्री कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील परवाना निरीक्षक अंकुश गायकवाड म्हणाले की, अनधिकृत होर्डिंग्जवर पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने कारवाई केली. त्यानंतर ज्यांचे होर्डिंग्ज होते, ते घेऊन जाणार होते. मात्र, त्यांनी अद्याप ते उचलले नाही. लवकरच ते उचलून नेण्याची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे म्हणाल्या की, अनधिकृत दुकानावर बांधकाम विभागाने कारवाई केली असेल, तर त्यांची जबाबदारी आहे. तसेच, अनधिकृत होर्डिंग्जधारकाला नोटीस दिल्यानंतर त्यांनी स्वतःच होर्डिंग्ज काढले आहेत. मात्र, लोखंडी अँगल्स उचलले नसतील, तर ते उचलून नेण्यासाठी त्यांना सांगितले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कनिष्ठ अभियंता अनुप गुज्जलवार म्हणाले की, रस्ता रुंदीकरणासाठी अनधिकृत दुकानांवर कारवाई केली. त्यानंतर पथविभागाला राडारोडा उचलण्यासाठी पत्र दिले आहे, असे त्यांनी सांगितले.