esakal | बाटलीबंद पाणी उत्पादकावर  उरुळी कांचनमध्ये कारवाई 
sakal

बोलून बातमी शोधा

water-bottle

विनापरवाना बाटलीबंद पाणी विकणाऱ्या उरुळी कांचन येथील व्यावसायिकाला अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) "स्टॉप ऍक्‍टिव्हिटी'ची नोटीस बजावली आहे.

बाटलीबंद पाणी उत्पादकावर  उरुळी कांचनमध्ये कारवाई 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - विनापरवाना बाटलीबंद पाणी विकणाऱ्या उरुळी कांचन येथील व्यावसायिकाला अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) "स्टॉप ऍक्‍टिव्हिटी'ची नोटीस बजावली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच बाटलीबंद पाण्याची मागणी वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. 

उरुळी कांचन येथील शंभो इंडस्ट्रीजमध्ये अभिजित चांदगुडे यांच्या मालकीच्या प्लॅंटची "एफडीए'ने नुकतीच तपासणी केली. यात 20 लिटरच्या बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करण्यात येत होते. संतोष घोडके हे या उत्पादनाची विक्री करीत असताना ही तपासणी करण्यात आली. त्यात पाण्याचे उत्पादन करताना परवाना घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. त्या आधारावर परवाने घेईपर्यंत बाटलीबंद पाण्याचे उत्पादन घेऊ नये (स्टॉप ऍक्‍टिव्हिटी), असा आदेश अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे यांनी दिला. येथील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते म्हणाले, ""बाटलीबंद पाणी उत्पादन करताना याची नोंदणी आवश्‍यक आहे. ही नोंदणी "एफडीए'कडे केलेली नव्हती. तसेच, बाटलीबंद पाण्याची विक्री करताना त्याच्या जारवर "ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड'ची (बीएसआय) मोहोर असणे आवश्‍यक असते. ती यावर नव्हती. त्यामुळे "बीएसआय'ची मान्यता घेतली नसल्याचे तपासातून पुढे आले. तसेच, उत्पादित केलेले पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र "नॅशनल ऍक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोटेरट्रिज'च्या (एनएबीएस) मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून घेतलेले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.'' 

उन्हाळ्यामुळे मागणी वाढली 
शहरात फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे शहरातील मध्यवस्तींच्या पेठांसह उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. बाटलीबंद पाणी घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असतानाच ही कारवाई करण्यात आली.

loading image