इंदापूरच्या वैद्यकीय अधीक्षकांवर अखेर कारवाई... 

डाॅ. संदेश शहा
Wednesday, 20 May 2020

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांच्यावर अखेर राज्य सरकारच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारवाई केली. 

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहराबाहेर विलगीकरण करण्यात आलेल्या दोन कोरोना रुग्णांना तपासणीसाठी शहरात घेऊन येताना दक्षता न घेतल्याप्रकरणी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांच्यावर अखेर राज्य सरकारच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारवाई करून त्यांच्याकडे असणारा इंदापूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक पदभार पुढील आदेश येईपर्यंत काढून घेण्यात आला आहे. 

डॉ. मोरे यांचा पदभार वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे पत्र राज्य आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांनी दिले आहे. डॉ. मोरे यांच्या कामकाजाबद्दल अनेकांनी खासदार सुप्रिया सुळे व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांनी किमान चार वेळा उपजिल्हा रुग्णालयात बैठका घेऊन कामकाज सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा    

त्यातच मंगळवारी (ता. 19) डॉ. राजेश मोरे यांनी इंदापूर शहराजवळील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या मायलेकींना तपासणीसाठी इंदापुरात आणले. त्यावेळी योग्य दक्षता घेण्यात आली नाही. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे डॉ. मोरे यांच्या कार्यपद्धती बद्दल तक्रारी वाढत गेल्या. त्यातून त्यांचा तडकाफडकी पदभार काढून घेण्यात आला. 

शहरात अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, उपजिल्हा रुग्णालयात सुविधांमध्ये वाढ होऊन अकलूज, बारामतीस रुग्ण पाठविण्याऐवजी रुग्णांची सोय उपजिल्हा रुग्णालयातच झाली पाहिजे, अशी मागणी इंदापूरकरांनी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action finally taken against Indapur medical superintendent